उमरगा पोलिसात 2 जणाविरुद्ध गुन्हा नोंद – हॉस्पिटल, डॉक्टर सहभागी ? रॅकेट, तपास सुरु
धाराशिव – समय सारथी
एकच वाहन आणि एकच मालक असताना वेगवेगळ्या ठिकाणी खोटे अपघात झाल्याचे दाखवीत विमा कंपन्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या कटाचा पर्दाफाश झाला असुन उमरगा पोलिस ठाण्यात 2 जणाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रत्येक वेळी उमरगा येथील ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ येथे उपचार घेतल्याचे दाखविले गेले त्यामुळे या हॉस्पिटलसह तेथील डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. विमा घोटाळ्यात हॉस्पिटल सहभागी असल्याचा आरोप होत असुन या रुग्णालयात असे किती प्रकार झाले याची चौकशी होणे गरजेचे आहे.
बजाज जनरल इन्सुरंस लिमीटेड या कंपनीचे ब्रांच ऑपरेशन सव्हिस मॅनेजर सोपान बिरादार यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. कलम 336(3), 340(2), 318(1), 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथील मोटार अपघात दावा प्राधीकरण येथून लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार शिरशी येथील भिमराव गुणवंत काळे यांनी मोटार सायकल क्रमांक एमएच 25 डब्ल्यु 6495 चे मालक युवराज शिवलिंगप्पा कारभारी (रा. खजुरी तालुका आळंद जिल्हा कलबुर्गी) व बजाज जनरल इन्सुरंस कंपनीकडुन अपघात विमा मिळण्यासाठी दावा दाखल केला आहे.
भिमराव काळे हा त्याच्या गाडीने आळंद ते उमरगा प्रवास करत असताना उमरगाकडुन आळंदकडे येणारी कारभारी याच्या गाडीने धडक दिली. कारभारी याने निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून धडक दिली त्यामुळे काळे याच्या डाव्या पायाला फ्रेंक्चर होऊन ते गंभीर जखमी झाले. या दाव्याची लीगल टीमने अंतर्गत चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
अपघाताच्या अनुषंगाने उमरगा पोलिसात गुन्हा नोंद झाला. युवराज कारभारी याच्याबाबत अधिक माहीती घेतली असता, समजले की अपघाताबाबत उमरगा पोलिस ठाण्यात 2 तर आळंद येथे 1 गुन्हा नोंद आहे, ज्यात तीच मोटारसायकल व तोच गाडी मालक आहे. आकाश घोटाळे यांनी दावा क्रमांक 246/2024 यामध्ये पण तीच कारभारी यांच्या मालकीची मोटारसायकल क्रमांक 6495 होती.
चाकी वाहन क्रमांक के ए 28 एम 2780 चा मालक रमेश शेरी याचे नावे वेगवेगळ्या कंपन्यांकडे इन्शुरन्स क्लेमसाठी 10 दावे व मोटारसायकल क्रमांक के ए 32 इ एन 4684 चा मालक रमेश शेरी याचे नावे वेगवेगळ्या कंपन्यांकडे इंन्सुिरंस क्लेमसाठी 10 दावे दाखल असुन त्यातील 2 दावे बजाज कंपनीकडे आहेत.
युवराज शिवलिंगप्पा कारभारी व रमेश करसप्पा शेरी या दोघांनी मिळून संगणमत करून विमा कंपनीकडून पैसे मिळावे या हेतूने अपघाताबाबत वेगळ्या पोलिस स्टेशन मध्ये, वेगवेगळ्या कंपनीकडे अपघात विमा मिळणेबाबत एकच वाहन असुन एक गाडी मालक दाखवुन पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला. अपघातात जखमी झाले बाबत फक्त ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल उमरगा येथेच उपचार घेतल्याचे दाखवून खोटे गुन्हे दाखल करून फसवणूक केली.











