धाराशिव – समय सारथी
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर विभागाने धाराशिव जिल्ह्यातील ढोकी परिसरात मोठी कारवाई करत गांजा व चरस विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल 50 किलो 358 ग्रॅम गांजा, 131 ग्रॅम चरस, 21 तोळे सोने आणि रोख रक्कम असा एकूण 69 लाख 19 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बाप्पा शंकर पवार (रा. तेरणानगर, ढोकी) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पथकाला 13 ऑगस्ट 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सकाळी पवार यांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी घरात गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला तसेच चरस, सोने आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली. कारवाई दरम्यान संबंधित व्यक्तीचा दुमजली आलिशान बंगला असल्याचे समोर आले. या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबवर पत्त्यांचा क्लब सुरू असल्याचेही पथकाच्या निदर्शनास आले. तेथे जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले.
इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा आणि चरस नेमका कुठून आणण्यात आला? त्याचा पुरवठा कोण करत होते? तसेच हा अंमली पदार्थ कोणाला विकला जात होता, याचा तपास सुरू आहे. ढोकी पोलीस ठाणे येथे बाण्णा शंकर पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक अजित टिके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, सहायक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, पोलीस हवालदार शैला टेळे, सुरेश राऊत, कैलास गाडेकर, नितीन जाधव, रवींद्र साळवे, पोलीस अंमलदार नागेश कंद्रे, निलेश सरपाळे, राहुल काळे, अतुल तुंबे, हरीश मुंडे, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्योती कीर्तीकर, प्रियंका पवार, आग्रपाली सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.












