धाराशिव – समय सारथी
जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत 3 जुलै 2026 रोजी प्राथमिक शिक्षकांच्य पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली होती. या पदोन्नती प्रक्रियावर शिक्षकांनी आक्षेप घेत काही संघटना यांनी नियमबाह्य व आर्थिक देवाण घेवाणीचा आरोप केला होता. त्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असुन राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. मार्गदर्शन आल्यावर ही प्रक्रिया नव्याने राबविण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते घेण्यात आल्याची माहिती अध्यक्षा अर्चना ताई पाटील यांनी दिली.
पदोन्नती प्रक्रिया ही प्रचलित शासन निर्णय, शासन परिपत्रके, शासनाची मार्गदर्शक पत्र तसेच संबंधित न्यायालयीन आदेश व निर्देश यांचा विचार करून व त्यांचे पालन करून नियमानसार पार पाडण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, सदर पदोन्नती प्रक्रियेबाबत विविध शिक्षक संघटनांकडुन तसेच संबंधित शिक्षकांकडुन आक्षेप व तक्रारी प्राप्त झालेल्या असुन पदोन्नती प्रक्रियेमध्ये काही बाबतीत अनियमितता राहिलेली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तक्रारींच्या अनषंगाने संबंधितांना योग्य तो न्याय मिळणे तसेच भविष्यात सदर पदोन्नती प्रक्रियेबाबत कोणताही प्रशासकीय अथवा न्यायालयीन वाद निर्माण होऊ नये. यासाठी या बाबींची सर्वकष पडताळणी होणे आवश्यक आहे असे अध्यक्षा अर्चना पाटील म्हणाल्या.
प्रशासनाने सदर प्रक्रिया शासन निर्णय, शासन पत्रे व न्यायालयीन आदेशांचे पालन करून पुर्ण केल्याचे स्पष्ट केले असले, तरी शिक्षक संघटनांकडुन उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांचा विचार करता, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार तसेच सर्व संबंधित शिक्षकांच्या हिताच्या दृष्टीने सदर पदोन्नत प्रक्रियेची पृनर्तपासणी/पुनर्वचार करणे उचित राहील असा निर्णय घेण्यात आला.
प्राप्त तक्रारी, आक्षेप व उपलब्ध अभिलेख यांचा सर्वंकष विचार करून 3 जुलै रोजी पार पाडण्यात आलेली प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार पदोन्नतीची प्रक्रिया नव्याने पार पाडण्याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविणेबाबत निर्णय घेण्यात यावा असा ठराव अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मांडला. त्यानुसार, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सदर विषया संदर्भात ठराव मंजूर करून, पुढील कार्यवाही व आवश्यक मार्गदर्शन मिळणेकरीता सदर ठराव शासनाकडे सादर करण्यात यावा असा ठराव सर्वानुमते मंजुर झाला.











