धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद शाळेत यावर्षीपासून 1 ली ते 5 वी पर्यंत सेमी इंग्रजी सुरु करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळेत सेमी इंग्रजी सुरु करण्याठी जिल्हा परिषदेची विशेष सभा अध्यक्ष अर्चना ताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. 9 एप्रिल पर्यंत प्रस्ताव मागवले होते, त्यानंतर मुदतवाढ दिली गेली. शाळा व्यवस्थापन, पालक, मुख्याध्यापक संमती पत्र व शिक्षक शिकवण्यास तयार असल्याचे हमी पत्र मागितले होते. 1038 प्रस्ताव प्राप्त झाले त्यातील 816 परिपूर्ण होते, उर्वरित त्रुटी पुर्ण करून ते शिक्षण संचालक यांच्याकडे पाठवून गणित व विज्ञान या विषयांची पाठय पुस्तके मागणीचा ठराव एकमताने घेतला.
सेमी इंग्रजी माध्यम हे अगोदर पण सुरु होते, 1 ली ते 5 वी सोबत 10 वी पर्यंत करावे अशी मागणी कांचनमाला संगवे यांनी केली. शाळा व्यवस्थापन समितीने मागणी केल्यास व प्रस्ताव दिल्यास ते करू असे अध्यक्ष अर्चना पाटील म्हणाल्या. यापुर्वी झालेला हा प्रयोग बंद का पडला, त्यात काय चुकले, सेमी इंग्रजी का बंद करावे लागले याचा विचार करून उपाययोजना कराव्यात असे सदस्य महेंद्र धुरगुडे म्हणाले. सत्ता परिवर्तन व पदाधिकारी बदलल्याने ते बंद पडले असे अर्चना पाटील म्हणाल्या.
पटसंख्या वाढ ही दुसरा विषय आहे, मुले स्पर्धेत टीकावी हा मुळं हेतू आहे असे पाटील म्हणाल्या. जिल्ह्यात 1 हजार 68 शाळा असुन फक्त 12 शिक्षक हे इंग्रजी डीएड आहेत अशी माहिती शिक्षण अधिकारी यांनी दिली. स्टाफ किती आहे, प्रशिक्षण याची काळजी घ्या असे धुरगुडे म्हणाले. 4 थी व 5 वी ची इंग्रजी पुस्तके पाहावी, ते शिकवणे कठीण आहे. आहे त्या स्तिथीत हे चालेल का असे धुरगुडे म्हणाले. कधीतरी सुरुवात करावी लागेल नंतर आढावा घेऊन उपाययोजना करू असे पाटील म्हणाल्या.
यापुर्वी निर्णय झाला त्यात सुकानू समितीने केलेल्या शिफारशी पाहाव्यात जेणेकरून पुन्हा बंद करण्याची वेळ येणार नाही. गणित व विज्ञान या विषयाचे सेमी इंग्रजी कठीण आहे त्यामुळे जुन्या बाबी पाहाव्यात असे सदस्य जितेंद्र कानडे म्हणाले. धुरगुडे यांनी काही मुद्दे उपस्थितीत केल्यावर घमासान चर्चा झाली, मी समर्थनार्थ आहे असे म्हणत त्यांनी पडदा टाकला. शिक्षकांचे समायोजन, शाळा एकत्रीकरण, रिक्त विस्तार अधिकारी पदे भरणे यासह अन्य विषय चर्चेला आले.












