धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात 3 नवीन कला केंद्र सुरु करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सुनावणी अंती नाकारले आहेत, त्याबाबतचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी नुकतेच दिले आहेत. अंबिका, न्यु रेणुका व प्यासा कला केंद्र प्रस्ताव सादर केले होते मात्र ते विविध त्रुटीमुळे नाकारले आहेत. 6 कला केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले असुन नवीन 6 पैकी एकही मंजुर केलेला नाही. कला केंद्रबाबत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक रितू खोखर यांची ठोस भुमिका आहे.
कळंब तालुक्यातील वडगाव ज येथे अंबिका लोकनाट्य सांस्कृतिक लावणी कला केंद्रासाठी येडशी येथील नानासाहेब तानाजी पवार यांनी तर न्यु रेणुका लोकनाट्य कला केंद्रासाठी येडशी येथील सतीश वामन जाधव यांनी प्रस्ताव सादर केला होता. आळणी येथे प्यासा लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र सुरु करण्यासाठी श्रीपाल नारायण वीर व कळंब तालुक्यातील भाटशीरपुरा येथील शितल अच्युतराव गायकवाड यांनी प्रस्ताव सादर केला होता. गायकवाड हे धाराशिव येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत सेवेत असल्याची माहिती आहे.
वडगाव ज येथील गट नं 45 मध्ये सुधीरकुमार सुधर्म सस्ते यांच्या जागेमध्ये न्यु रेणुका कला केंद्र सुरु करण्यासाठी 11 डिसेंबर 2024 रोजी प्रस्ताव सादर केला होता. वडगाव ज येथील गट नं 20 मध्ये दत्तात्रय सत्यवान मुंढे यांच्या जागेमध्ये अंबिका कला केंद्र सुरु करण्यासाठी 15 मे 2025 रोजी अर्ज सादर केला होता. गेल्या एक ते दीड वर्षांपासून नवीन कला केंद्र सुरु करावे यासाठी सातत्याने प्रत्यन सुरु असुन विभागीय आयुक्त, न्यायालय ते मंत्रालयापासुन फिल्डिंग सुरु आहे. काही नेत्यांनी तर प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
अंबिका व न्यु रेणुका या दोन्ही कला केंद्र प्रस्तावात बांधकाम परवाना व इतर बाबतीत त्रुटी होत्या तसेच पद्मसिंह दत्तात्रय मुंढे व इतर 225 ग्रामस्थानी 30 डिसेंबर 25 रोजी तक्रारी अर्ज दिला होता त्यात त्यांनी नाहरकत प्रमाणपत्र बोगस असल्याचे व ग्रामसभा नियमानुसार घेतली नसल्याची तक्रार केली होती. न्यु रेणुका इथे एक सभागृह त्याला जोडून 17 स्वतंत्र बंद खोल्या असे बांधकाम केले होते, तर अंबिका कला केंद्र येथे एक सभागृह त्याला जोडून 7 स्वतंत्र बैठक रूम व 10 स्वतंत्र निवासी रूम बांधल्या होत्या. स्वतंत्र बंद बैठक खोल्या, व निवासी बांधकाम तरतूद नाही. पोलिस अधीक्षक यांनी सुद्धा हरकत असल्याचा अहवाल सादर केला होता, अनेक त्रुटी असल्याने प्रस्ताव नाकारला.
आळणी येथील गट क्रमांक 415 मध्ये श्रीपाल वीर यांच्या जागेमध्ये प्यासा कला केंद्र सुरु करण्यासाठी 8 मे 2025 रोजी अर्ज दाखल केला होता. ज्या जागेत सार्वजनिक मनोरंजन कार्यक्रमाची इमारत उभारायची आहे त्या जागेमध्ये कायमस्वरूपी इमारत अगोदरच उभी केली आहे. इमारतीपासुन दर्शन बिअर बार व परमिट रूम 25 फुट अंतरावर आहे. मान्यतेसाठी सादर केलेले रेखाकन हे हॉटेल रेस्टोरंटच्या वाणिज्य प्रयोजनासाठी दाखविले होते. इथे 1 सभागृह व त्याला जोडून 23 स्वतंत्र बंद खोल्या असल्याचे दाखवले.
अंबिका कला केंद्राला परवाना नसताना देखील तिथे नावाचे बोर्ड लावुन इतर यंत्रणा सज्ज करीत खास ग्राहकांसाठी शाही सोय करण्यात आली होती. वडगाव ज, आळणी, चोराखळी ही कला केंद्र असलेली गावे असुन येथील काही ग्रामस्थांचा त्याला विरोध आहे. देवी देवतांची नावे कला केंद्राना दिली आहेत. अनेक कला केंद्रावर हाणामारीचे प्रकार घडले असुन काही ठिकाणी नर्तिकाना वेश्या व्यवसाय करायला भाग पाडणे, लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना घडून गुन्हा नोंद आहेत. कला केंद्रामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.
बाबासाहेब घाटे यांचा ‘पिंजरा’ तर अक्षय साळुंके यांच्या ‘महाकाली’ कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला होता त्यांनी नव्याने ‘नटरंग’ हा नवीन कला केंद्र तर अरविंद गायकवाड यांनी तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथील ‘चंद्राई’ कला केंद्रसाठी अर्ज केले असुन त्यातील अनेक प्रस्तावात त्रुटी असल्याने एकही नवीन परवाना जिल्हाधिकारी यांनी दिलेला नाही.











