Impact – दैनिक समय सारथी वृत्तपत्राने उघड केले होते रॅकेट
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी याबाबत गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सायबर पोलिसात गुन्हा नोंद करुन तो तुळजापूर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने हे रॅकेट उघड केले होते त्यानंतर त्याची दखल घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या रॅकेटच्या मास्टर माईंडचा शोध घेणे पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे.
मतदार नोंदणी करताना काही अर्जदार यांच्या अर्जासोबत जोडलेल्या आधार कार्डमध्ये नामांकन क्रम म्हणजे इनरॉलमेंट क्रमांक हा एकसारखाच आढळुन आला तसेच आधार कार्डवर डिजीटल सहीमध्ये दिनांक व वेळ एकसमान असल्याचे आढळून आले आहे. मोबाईल धारकांनी बनावट मतदार म्हणुन मतदार यादीमध्ये नांव समाविष्ट करण्यासाठी बनावट आधार कार्ड बनविले. भारत निवडणुक आयोगाचे व्होटर हेल्पलाईन नावाचे मोबाईल ॲपव्दारे लॉग ईन करून ऑनलाईन बनावट कागदपत्र सादर करून भारत निवडणुक आयोगाची फसवणुक केली अशी तक्रार तहसीलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी अरविंद शंकरराव बोळंगे यांनी दिली. भारतीय न्याय संहिताचे कलम 172,3(5),318(2),335,336(2)(3),340(2),61(2),62 अन्वये सायबर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 2 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या दरम्यान गुन्हा घडला आहे.
बोगस आधार कार्ड, रहिवासी दाखले, मोबाईल नंबर, फोटो व इतर कागदपत्रे वापरून तुळजापूर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात फॉर्म 6 भरून अर्जाची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे त्या गावचे नागरिक नसुन त्यांना गावात कोणीही ओळखत नाही. फॉर्म 6 भरताना त्यांनी स्थानिक नागरिक असल्याचे काही पुरावे जोडले आहेत ते ही बोगस आहेत. अमोल शिवाजीराव जाधव यांनी निवडणुक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे तक्रार केली असुन मतदार संघातील सर्व गावातील नोंदणी व मंजुर आणि नामंजूर झालेल्या अर्जाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आरोही उमेश सगाटे, नीलिमा शेखर रबाळे,शैलेश किशोर सालगे, तुषार पंकज इनागटे यासह 50 जणांच्या नावे फॉर्म 6 ( नवीन मतदार नोंदणी ) हंगरगा नळ या गावात मतदार नोंदणीसाठी अर्ज भरला आहे. अर्ज भरताना जे आधार कार्ड जोडण्यात आले ते नंबर व कार्ड अस्तित्वात नसुन त्याचा इनरॉलमेंट नंबर व वेळ एकच आहे त्याचा अर्थ हे सगळे बोगस कार्ड आहेत. त्यांचे वय व फोटो या इतर बाबी पाहता त्या कुठेही जुळत नाहीत. ज्येष्ठ नागरिक, महिला, कॉलेज विद्यार्थी यांच्या नावाने बोगस आधार कार्ड, मोबाईल नंबर, फोटो व इतर कागदपत्रे वापरून अर्ज करण्यात आले आहेत.काही विद्यार्थी यांचे फोटो हे मेडिकल ऍप्रॉन, सुट घालुन आहेत.
तुळजापूर मतदार संघात 410 मतदान केंद्र असुन 3 लाख 82 हजार 467 मतदार आहेत त्यात 30 हजार 625 नवीन नोंदणी केलेले मतदार आहेत तर अजुनही नवीन नावे नोंदविणे सुरु आहे. 22 ऑक्टोबर नवीन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. हीच संधी साधत तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस मतदार नोंदणी अर्ज करण्यात आले असुन ते बीएलओ स्तरावर प्रलंबित आहेत. बोगस अर्ज नोंदणीचे एक मोठे रॅकेट व यंत्रणा कामाला लागली आहे. तुळजापूर तालुक्यातील हंगरगा गावासह अन्य गावात बोगस नावे अर्ज नोंदणी केली आहेत, त्याचाही तपास होणे गरजेचे आहे.