धाराशिव – समय सारथी
हॉटेलमधील रूममध्ये आराम करण्यासाठी जात असलेल्या एका 19 वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहारात घडली असुन त्या विवाहितेच्या पतीला मारहाण देखील करण्यात आली आहे. 3 जणांवर या प्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन 2 जणांना अटक केली आहे, 1 आरोपी फरार आहे. विजय राठोड,संदेश जाधव व पृथ्वीराज अण्णा बनसोडे अशी आरोपींची नावे असुन राठोड व संदेशला 2 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या हॉटेलला सील करण्याची मागणी होत आहे.
पीडित 19 वर्षीय महिला आणि तिचा पती 22 जूनच्या रात्री एका हॉटेलमधील रूममध्ये आराम करण्यासाठी जात होते. दरम्यान हॉटेलमध्ये असलेल्या तीन तरुणांनी त्यांना गाठले. आरोपींनी पीडितेच्या पतीला चाकूचा धाक दाखवून जागेवरच थांबवून ठेवले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तीन आरोपींपैकी एकाने विवाहितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. यावेळी पीडितेच्या पतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, इतर दोन्ही आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
“हा प्रकार जर कोणाला सांगितला, तर तुम्हा दोघांना जिवें मारून टाकू,” अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. भारतीय न्याय संहिता कलम ६४(१) (बलात्कार), १२६, १२७ (बेकायदेशीर डांबून ठेवणे), ११८(१), ३२४(४) (घातक शस्त्राने मारहाण करणे), ३५१(२), ३५१(३), ३५२ (जिवे मारण्याची धमकी देणे), ३(५) (समान हेतूने गुन्हा करणे) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१) (आर) (एस), ३(१) (डब्ल्यु (i) (ii) व ३ (२) (व्हीए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.











