धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइव्हर समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांड खटल्यातुन माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. तब्बल 17 वर्षाच्या संघर्षानंतर डॉ पाटील यांना न्याय मिळाला, त्यांनी केलेल्या संघर्षाच्या गौरवासाठी आणि न्याय देवतेचे आभार मानण्यासाठी धाराशिव येथे गौरव समारंभ व भव्य सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. आगामी 8 ते 10 दिवसात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मल्हार पाटील यांनी दिली. तत्कालीन अनेक दिग्गज नेते, डॉ पाटील यांचे त्या काळातील सहकारी यांना विशेष आमंत्रित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा अंतीम टप्प्यात आहे.
मल्हार पाटील यांनी सोशल मीडिया पोस्ट करून भावना व्यक्त केल्या आहेत. खोट्या आरोपांची राळ, असंख्य प्रश्न, अनेक राजकीय वादळं आणि अखेरीस तब्बल 17 वर्षांनंतर, 20 जून 2026 रोजी न्यायालयाच्या निर्णयाने धाराशिवचे अनभिषिक्त सम्राट, तेरणेचे सिंह आणि धाराशिवचे भगीरथ डॉ. पद्मसिंह पाटील यांची लांछनास्पद आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली. हा विजय केवळ या डॉ पद्मसिंह पाटील यांचा नाही हा सत्याचा, न्यायाचा आणि पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेच्या विश्वासाचा विजय आहे अशी पोस्ट मल्हार पाटील यांनी केली.
डॉ पदमसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्हा बँक, तेरणा साखर कारखाना, दूध संघ या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी मोठे योगदान दिले. 1975 साली गाव पातळीवरून सुरू झालेला त्यांचा प्रवास… सहा वेळा आमदार, गृहमंत्रीपदासह अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी, आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेलं अमूल्य योगदान… हा त्यांच्या संघर्षाचा आणि सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवास आहे.
1990 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठीही त्यांचं नाव चर्चेत होतं. नंतरच्या काळात खासदार म्हणून निवडून आल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी जबाबदारी आणि कॅबिनेट विस्तारात संधी मिळण्याची शक्यता होती. पण याच काळात त्यांची घौडदौड रोखण्यासाठी त्यांच्या राजकीय प्रवासात जाणूनबुजून निराधार आरोपांनी मोठा अडथळा उभा केला गेला. अनेक कार्यकर्त्यांच्या मनात आजही हीच रुखरुख आहे. या अघटीत घटनेमुळे महाराष्ट्रच नव्हे तर देश एका आश्वासक नेतृत्वाला मुकला. धाराशिवच्या विकासाला खीळ बसली.
17 वर्षांनंतर का होईना आरोपांच्या घनगर्द आभाळमागे झाकोळला गेलेला सूर्य पुन्हा एकदा सत्याची किरणे घेऊन उजळमाथ्याने समोर आला. ही वेळ एका ज्येष्ठ नेत्याच्या संयमाला, त्याच्या योगदानाला आणि संघर्षाला सलाम करण्याची आहे, त्याचप्रमाणे या 17 वर्षांच्या वनवासात डॉ पद्मसिंह पाटील आणि कुटुंबीयांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांबद्दल ऋण व्यक्त करण्याची देखील आहे.
एका नव्या ऊर्जेने, उत्साहाने धाराशीवच्या विकासासाठी पाटील कुटुंबीय आजही कटिबद्ध आहे, विकासाची जी गंगा रोखण्याचा प्रयत्न झाला ती गंगा पुन्हा मोठ्या ताकदीने वाहती करण्याची तयारी आणि कुवत पाटील कुटुंबामध्ये नक्कीच आहे. आता गरज आहे ती फक्त आपण त्याच ताकदीने पुन्हा सोबत उभे राहण्याची. चला तर, लवकरच भेटू संघर्षातून उभा राहिलेल्या या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या गौरवासाठी..! आणि न्याय देवतेचे आभार मानण्यासाठी..! असे म्हणत आगामी काळात डॉ पाटील यांचा गौरव समारंभ सभा आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले.











