धाराशिव – समय सारथी
स्वतःच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम पित्यास कोर्टाने 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. उमरगा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश खुर्शीद फकीर मोहम्मद खान यांनी ही शिक्षा सुनावली. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता संदीप देशपांडे यांनी केलेला युक्तिवाद व मांडलेले पुरावे ग्राह्य धरून शिक्षा सुनावली.
मुली घरात सुद्धा सुरक्षित नसल्याचे या घटनेने सिद्ध झाले आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेत दुसऱ्या मुलाने अत्याचार केल्याचा बनाव करीत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांमुळे भांडाफोड झाला. आई मजुरीने कामाला गेल्यावर डाव साधत बापाने मुलीवर अत्याचार केले व त्यानंतर ओळख नसलेल्या एका दुसऱ्या मुलाचे नाव सांगून गुन्हा नोंद करायला लावला.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील अल्पवयीन असलेल्या मुलीने 15 जुन 2023 पोलिस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल केला होता. शेजारील राहणाऱ्या एका मुलाने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेऊन अत्याचार केले, यामुळे ती तीन महिन्यांची गरोदर राहिली व तिला गर्भपात करायचा असल्याबाबत फिर्याद दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक अनुसया राजेंद्र माने यांनी या प्रकरणामध्ये कसून तपास केला. यामध्ये मुलीचा बापच अत्याचारी निघाला.
याप्रकरणी सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. महिला दक्षता समिती सदस्या सुवर्णा पाटील, लातूर येथील वैद्यकीय अधिकारी विष्णू तरसे, मयुरा कांबळे, विश्वनाथ स्वामी आदींची साक्ष यामध्ये महत्त्वपूर्ण ठरली.
फिर्यादीत दिलेल्या संबंधित व्यक्तीने मुलीवर अत्याचार केले नसल्याचे तपासात समोर आले. तेव्हा माने यांनी उमरग्यात मुलीला गर्भपातासाठी नेण्यात आलेल्या रुग्णालयात जाऊन तिला विश्वासात घेत चौकशी केली. तेव्हा तिने संबंधित व्यक्तीला ओळखत नसल्याचे सांगून आई मजुरीसाठी गेल्यावर वडिलांनीच अत्याचार केल्याचे तिने सांगितले. पोलिस उपनिरीक्षक अनुसया माने यांनी संबंधित वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास केला.











