बीड – समय सारथी
करोडो रुपयांच्या भुसंपादन घोटाळ्यात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली असुन त्यांना 15 मे पर्यंत 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाठक यांच्याबाबत आता आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली असुन पाठक यांना वाल्मिक कराड यानेच धनंजय मुंडे यांच्यामार्फत बीडला जिल्हाधिकारी म्हणुन आणले असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला.
मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. उपमुख्यमंत्र्यांपासून अनेकांनी मस्साजोगला भेट देऊन सांत्वन केले मात्र जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी कधीही पीडित कुटुंबाची भेट घेतली नाही. विशेष म्हणजे, पाठक आठवड्यातून किमान दोन वेळा लातूरला जात असत. लातूरला जाण्यासाठी त्यांना मस्साजोगवरूनच जावे लागत आणि संतोष देशमुख यांचे घर मुख्य रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आहे तरीही ते आले नाहीत यावरून अनेक बाबी स्पष्ट होतात.
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या शब्दाखातरच पाठक हे बीडमध्ये आले होते. त्यामुळेच त्यांनी कधी मस्साजोगची पायरी चढली नाही, असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला. कायदा व सुव्यवस्था राखणे ही जिल्हाधिकाऱ्यांची नैतिक जबाबदारी असतानाही, ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलने केली, जलसमाधीचा इशारा दिला मात्र पाठक यांनी कधीही आंदोलकांशी संवाद साधण्याची तसदी घेतली नाही.











