विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या सरकारचा तीव्र निषेध
धाराशिव – समय सारथी
पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील गोंधळ आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या त्रुटींमुळे देशभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुतळ्याचे दहन करून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी पेपरफुटीच्या वाढत्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. तसेच भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार तातडीने रोखावेत, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.












