हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न – आमदार कैलास पाटीलांची टीका
धाराशिव
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी, पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी धाराशिव शहरात आयोजित कँडल मार्चला भर पावसातही विद्यार्थी, युवक, पालक, महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुसळधार पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांनी अन्यायाविरोधात एकजुटीची ताकद दाखवून दिली.
पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ आणि वाढती बेरोजगारी याविरोधात सहभागी नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन निषेध नोंदवला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या आंदोलनातून देण्यात आला. सहभागी नागरिकांनी शिक्षण आणि रोजगार व्यवस्थेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि उत्तरदायित्वाची मागणी केली.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे देशभरातील विद्यार्थी, पालक आणि युवक शिक्षण व्यवस्थेतील गंभीर प्रश्न, नीट पेपरफुट, परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ, पारदर्शकतेचा अभाव आणि न्यायाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना केंद्र सरकारने त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी लाठीमार, पोलिसी बळ आणि दडपशाहीची भाषा वापरली. या हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध नोंदवण्यासाठी धाराशिवकरांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला आमदार कैलास पाटील यांनी पाठिंबा दर्शविला.
विद्यार्थ्यांच्या हातात दगड नव्हते, शस्त्रे नव्हती; त्यांच्या हातात संविधानावरचा विश्वास आणि न्यायाची अपेक्षा होती. मात्र त्यांच्यावर लाठ्या चालवून केंद्र सरकारने लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांचा आवाज दडपणे ही लोकशाही नव्हे, तर हुकूमशाही आहे अशी टीका केली.
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट पेपरफुटीसारख्या घोटाळ्यांवर मौन बाळगणारे सरकार, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार रोखण्यात अपयशी ठरले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याऐवजी न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवरच पोलिसांचा बळाचा वापर करण्यात आला. ही कृती अत्यंत निषेधार्ह असून विद्यार्थ्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवणे म्हणजे भारताच्या लोकशाही मूल्यांवरच आघात आहे.
धाराशिवमध्ये काढण्यात आलेला कॅन्डल मार्च हा निषेध मोर्चा नव्हता; तर तो संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी दिलेला निर्धाराचा संदेश होता. मेणबत्तीचा प्रत्येक प्रकाशकिरण हा विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याचा साक्षीदार होता आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधातील जनआक्रोशाचे प्रतीक होता असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांचा आवाज लाठीने दाबता येत नाही. अन्यायाविरोधातील संघर्ष अधिक तीव्र होत जातो. आज विद्यार्थ्यांवर लाठी चालली आहे; उद्या हा प्रश्न प्रत्येक कुटुंबाच्या भविष्याचा असेल. त्यामुळे देशातील युवक, पालक आणि जागरूक नागरिकांनी आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी एकत्र उभे राहणे ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले.











