तलवार, चाकू, कोयत्याने हल्ल्याचा आरोप – धार्मिक कार्यक्रमादरम्यान दुचाकी चोरीच्या वादातून राडा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील बुकनवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी तलवार, चाकू आणि कोयत्याने हल्ला झाल्याचा आरोप असून, यात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा शनिवारी सकाळी सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य तीन तरुण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर बुकनवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कावळेवाडीचे सरपंच ऍड अजित खोत यांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली व कारवाईची मागणी केली.
बुकनवाडी येथे शुक्रवारी एका समाजाचा धार्मिक कार्यक्रम सुरू होता. याचदरम्यान गावातील एका व्यक्तीची दुचाकी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर दुचाकी मिळून आली. मात्र, त्यानंतर एका गटाकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. यावरून वाद वाढत जाऊन दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे.
या वादानंतर जमावाने काही तरुणांवर तलवार, चाकू आणि कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात चार तरुण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
बुकनवाडी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.











