तुळजापूर – समय सारथी
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील सरपंच सौ सुरेखा नागनाथ सुतार यांना राज्य निवडणुक आयोगाने मोठा दिलासा दिला असुन त्यांच सरपंचपद कायम ठेवले आहे, जिल्हाधिकारी यांनी सुतार यांचे सरपंचपद रद्द करीत निवडणुक लढवण्यास बंदी आणली होती मात्र तो निर्णय रद्द ठरवला आहे.
2022 मध्ये ग्रामपंचायत माळुंब्रा, येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक पार पडल्यानंतर सदर निवडणुकीमध्ये सरपंच म्हणुन सौ. सुरेखा नागनाथ सुतार या बहुमताने जनतेतुन निवडुन आल्या. त्यानंतर दोन वर्षांनी विनोद राजाराम देवकर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांचेकडे ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 ब (1) प्रमाणे सरपंच सौ. सुरेखा सुतार यांनी ग्रामपंचायत निवडणुक लढवत असताना थेट सरपंच निवडणुक व एका प्रभागातुन सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले व सदर दोन्ही नामनिर्देशनपत्रा सोबत एकच बँक खाते दर्शवले. तसेच निवडणुकीचा खर्च राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विहित पद्धतीने दाखल केला नाही. या मुद्यावर त्यांना अपात्र करावे म्हणुन प्रकरण दाखल केले होते.
त्यावर जिल्हाधिकारी धाराशिव यांनी 24 जुन 24 रोजी सरपंच सौ. सुरेखा सुतार यांना अपात्र करुन 5 वर्षांकरिता निवडणुक लढविण्यास बंदी घातली होती. सदर निर्णयाच्या विरुद्ध संरपंच सौ. सुरेखा सुतार यांनी ॲड. रमेश एस. मुंढे यांचे मार्फत राज्य निवडणुक आयोग मुंबई यांचेकडे अव्हान याचिका दाखल केली होती. विशेष बाब म्हणजे सदरची आव्हान याचिका 1 जुलै रोजी दाखल केल्यानंतर राज्य निवडणुक आयोगाने प्रकरणात 30 जुलै रोजी प्रकरण सुनावणीस ठेवुन प्रकरणात सदर दिवशीच अंतिम सुनावणी घेवुन सरपंच सुरेखा सुतार यांचे बाजुने निकाल दिला.
ॲड रमेश मुंढे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी धाराशिव यांचा निर्णय रद्द करुन सुरेखा सुतार यांचे सरपंच पद अबाधित ठेवले आहे.