धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की व सौरऊर्जा निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यानी अकृषी कर (बिगर शेती कर) न भरल्याने सरकारचा करोडो रुपयांचा महसुल बुडाला आहे. बिगर शेती कर वसुल करावा किंवा माफ करावा याबाबत जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्याकडे लेखी मार्गदर्शन मागविले आहे. ऊर्जा विभाग व महसूल विभाग यांच्या निर्णयात सुस्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन मागवले आहे तर धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की व सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची संख्या व इतर माहिती महसूल प्रशासनाकडे नसल्याने निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी सर्व तहसीलदार यांना लेखी पत्र काढत पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्पांची गाव व कंपनीनिहाय माहिती तात्काळ देण्यास सांगितले आहे.
अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020 अंतर्गत 30 जुन 2022 च्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयानुसार अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहनात्मक सुधारणा व आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य शासनाने काही सोयी सवलती दिल्या आहेत त्यानुसार सौरभ पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी बिगर शेती कर माफ करण्यास मान्यता दिली आहे मात्र महसूल वन विभागाचा बिगर शेती करमाफी बाबत कोणताही शासन निर्णय नसल्यामुळे कर माफ करावा किंवा कसे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे जिल्हाधिकारी यांनी सरकारकडे मार्गदर्शन मागवले.
धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विविध कंपन्या सर्व पवन ऊर्जा वीज निर्मिती प्रकल्प सुरू करीत आहेत, त्यासाठी ते ऊर्जा विभागाच्या निर्णयाचा आधार घेत प्रकल्पास अकृषी कर भरण्याची आवश्यकता नसल्याचे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवीत आहेत. राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाचा 2022 निर्णय असला तरी त्यापुर्वी अनेक सौर व पवनचक्की प्रकल्प सुरु झाले आहेत त्यातील अनेकांनी अकृषी कर भरला नाही, तो तपासून वसुल करणे गरजेचे आहे.
धाराशिव जिल्ह्यात सौर ऊर्जा व पवनचक्की प्रकल्प फार पुर्वीपासुन कार्यरत आहेत मात्र त्यांची आकडेवारी, त्यांनी अकृषी परवाना घेतला का ? किती कर भरला यांची कोणतीही माहिती महसुल प्रशासनाकडे उपलब्ध नाही. जिल्ह्यात जवळपास 10 कंपन्यानी शिरकाव केला असुन काम सुरु केले असुन त्या कंपनी यांना कामगार पुरवीणे, बांधकामचे सिव्हिल काम व सुरक्षा पुरविण्याच्या नावाखाली टोळी युद्ध सुरु झाले असुन 3-4 गँग सक्रीय झाल्या आहेत, यातून गोळीबार, हाणामारीसारखे प्रकार वाढले आहेत.