धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील डॉ बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या एका 34 वर्षीय महिला विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी करणे, तिचा मानसिक छळ करणे व तिच्या पतीला धक्काबुक्की केल्या प्रकरणी प्रबुद्ध गायकवाड व सुरज काशीद या 2 विद्यार्थीवर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा आनंद नगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.
धाराशिव येथील रहिवासी असलेली 34 वर्षीय महिला ही डॉ बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत आहे. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास ती महाविद्यालयात गेली असताना, तेथीलच दोन आरोपींनी तिला विनाकारण त्रास देण्यास सुरुवात केली. महिला विरोध करत काही बोलत नसल्याचे पाहून आरोपींनी तिचा सातत्याने पाठलाग केला.
“तुम्ही मला बोलत का नाही?” असे म्हणत अश्लील भाषेत अपशब्द वापरले. “तुम्ही नाही बोललात तरी आम्ही बोलणारच, जोपर्यंत तुम्ही इतर मुलींप्रमाणे आमच्याशी फ्री राहणार नाही,” अशी धमकी दिली. या प्रकारानंतर आरोपींनी फिर्यादीच्या पतीलाही धक्काबुक्की केली.
भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 68, 115(2),351(2) 351(3) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलीस निरीक्षक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.











