धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरात मागील वर्षी भाजप व महाविकास आघाडी या 2 राजकीय पक्षांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणुक स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला नसुन बक्षीसांची रक्कम देण्यात न आल्याने काही गणेश मंडळ व कार्यकर्ते यांच्यात नाराजी आहे. गणेश चतुर्थी अवघ्या 2 दिवसावर आलेली आहे तरी देखील बक्षीसांची रक्कम दिलेली नाही.
किमान विजेत्या मंडळाची नावे तरी जाहीर करायला हवी होती म्हणजे मंडळाना आर्थिक नियोजनचा आधार झाला असता. राजकीय समीकरण, आवड निवड व हेवेदावे बाजुला ठेवुन स्पर्धेचा निकाल निष्पक्ष व पारदर्शकपणे जाहीर व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सहभागी व विजयी मंडळाना कोणत्या मुद्यासाठी किती गुणांकन दिले व निवड समिती जाहीर करावी अशी मागणी होत आहे.
भाजप व महाविकास आघाडी अश्या दोन्ही राजकीय पक्षांकडुन शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन केले होते. नगर परिषद निवडणुक असल्याने 2025 ची शिस्तबद्ध विसर्जन मिरवणुक एक प्रकारे राजकीय आखाडा बनली असल्याचा अनुभव धाराशिवकर गणेश भक्तांना आला. दंड थोपटून केलेल्या कृत्याचा व रिल्सचा काहींना भविष्यात राजकीय लाभ देखील झाला. बाळा… नादी लागु नको, रडवीन व बडवीन असे म्हणत काहींनी या स्पर्धेत ‘राडा’ संस्कृतीचे दर्शन घडविले.
‘कसायं दणका’, ‘मल्हार पाटील बोलते’ व “नादी लागु नको, तुला ढोलकीला बांधून तुला बदा बदा बडवेन” अशी गाणी लावत खासदार ओमराजे निंबाळकर यांना डीवचले होते त्यावर ओमराजे यांनी शांत राहून स्टेजवरून स्मितहास्य करीत ‘प्रतिसाद’ दिला होता. यावर्षी कोणत्याही निवडणुका नसल्याने कदाचित सर्व पक्षीय राजकीय नेतृत्वाना तितकी गडबड व आवश्यकता वाटत नसावी अशीही चर्चा होत आहे. दहीहांडी उत्सव स्पर्धा सुद्धा यावर्षी झाल्या नाहीत, सोयीनुसार विसर पडला.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धा 2026 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 71 हजाराचे प्रथम पारितोषिक व सन्मानचिन्ह, 51 हजाराचे व्दितीय पारितोषिक व सन्मानचिन्ह, 31 हजाराचे तृतीय पारितोषिक व सन्मानचिन्ह असे जाहीर केले होते शिवाय 7 हजार 100 रुपये उत्तेजनार्थ 3 पारितोषिक व सन्मानचिन्ह असे बक्षीसांचे जाहीर स्वरूप होते मात्र राजकीय वरचढीत ‘बोली’ लावल्यासारखे तब्बल 3 लाख 50 हजार पेक्षा जास्त बक्षिसे जाहीर केली होती.
महाविकास आघाडी धाराशिव शहरच्या वतीने शिस्तबद्ध श्री गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धा 2025 आयोजित केली, त्यांनी 55 हजाराचे प्रथम पारितोषिक व सन्मानचिन्ह, 35 हजाराचे व्दितीय पारितोषिक व सन्मानचिन्ह, 25 हजाराचे तृतीय पारितोषिक व सन्मानचिन्ह असे जाहीर केले होते शिवाय 7 हजार रुपयांचे उत्तेजनार्थ 3 पारितोषिक व सन्मानचिन्ह जाहीर केले, प्रत्यक्ष मिरवणुकीवेळी भाजपचे स्टेजवरून दिले जाणारे आव्हान पाहता बक्षीस रकमेत भरघोस वाढ करण्यात आली.
दरवर्षी गणेश चतुर्थीपुर्वी 8 दिवस आधी ही बक्षिसे जाहीर कार्यक्रम घेऊन सन्मानाने दिली जातात मात्र यावेळी तुलनेत काहीसा उशीर होताना दिसत आहे. येत्या 2-3 दिवसात बक्षीस रक्कम देऊ असे दोन्ही स्पर्धा आयोजकांकडुन सांगण्यात येत आहे.











