धाराशिव – समय सारथी
परभणी येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा याला कोर्टाने 1 दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली आहे. अटक केल्यानंतर 4 दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर मिर्झा याला कोर्टात हजर केल्यानंतर पोलिसांनी अधिक तपासासाठी वाढीव पोलीस कोठडी मागितली, ती विनंती कोर्टाने मान्य करीत 1 दिवसांची पोलीस कोठडी दिली.
मिर्झा याला परभणी पोलिसांनी सापळा रचून जामखेड येथील एका कला केंद्रातुन अटक केली. मिर्झा व इतर आरोपीचा या गुन्ह्यातील सहभाग व इतर मुद्याचा पोलिस तपास करीत आहेत. बँक खाती, आर्थिक व्यवहार, सीडीआर व इतर पुराव्याच्या आधारे पोलिस तपास करीत असुन लवकरच काही धक्कादायक बाबी समोर येणार आहेत.
दरम्यान कळंब ड्रग्ज तस्करीत 4 पैकी 3 जणांना अटक केली असुन 1 जणांची रिमांड पुणे पोलिसांना मागितली आहे. निखिल युवराज जाधव व अरविंद दादाराव कांबळे या 2 आरोपीची न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे तर लखन गायकवाड हा पोलीस कोठडीत असुन 14 ऑगस्ट रोजी त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत आहेत. मिर्झा हा शिवसेना उबाठा गटाचा नगरसेवक असुन गुन्ह्यात अटक झाल्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे.
परभणी पोलिसांनी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीचा पर्दाफाश केला. सुरुवातीला अलीम शेख खाजा ( रा पाथरी, ) व शाहरुख फिरोजखान पठाण ( अंबाजोगाई बीड ) या 2 आरोपीना 14 लाख 63 हजार रुपयांच्या 72 ग्राम ड्रग्जसह 27 जुलै रोजी रंगेहात अटक केली. पोलिस निरीक्षक दर्शन शिंदे हे तपास करीत आहेत.
मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 365/2026 दाखल करून तपास करून 7 ऑगस्ट रोजी आणखी 6 आरोपीना अटक केली. त्यात कळंबचा नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा (रा. कळंब, जि. धाराशिव), अकीब अक्रम मोमीन (रा. बीड), बाबा मोमीन रफीक (रा. लातूर), सय्यद समीर सय्यद शब्बीर (रा. परळी वैजनाथ, जि. बीड), शेख सलमान शेख इरफान (रा. काकर मोहल्ला, परळी वैजनाथ) आणि अयान नासेर पठाण (रा. बरकत नगर, परळी वैजनाथ) यांचा समावेश आहे. या सर्वाना 8 ऑगस्टला कोर्टाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली त्यानंतर आणखी 1 दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली.












