राजकीय नेत्यांच्या कॅम्पमध्ये नोंदणी – मतदारांच्या घरी न जाता एकाच ठिकाणी कामकाज भोवणार
धाराशिव – समय सारथी
मतदारांच्या घरी न जाता राजकीय पदाधिकारी यांच्या कॅम्पमध्ये व कार्यालयात एकाच ठिकाणी बसून नोंदणी करणाऱ्या 7 बीएलओ विरोधात निवडणुक आयोगाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. कॅम्पमध्ये नोंदणी होत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या आदेशाने मतदार नोंदणी तथा उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी कारणे दाखवा नोटीसा काढल्या आहेत. 24 तासात खुलासा करा अन्यथा कारवाईला सामोरे जावा असा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. तहसीलदार डॉ मृणाल जाधव, नायब तहसीलदार स्वामी हे मोहिमेचे काम पाहत आहेत.
शम्स उलुम उर्दू हायस्कुल येथील सहशिक्षक तथा बीएलओ सय्यद जुनेदी क्वादारी यांच्यासह बीएलओ सुनील सुखदेव मोहीते, बाबासाहेब महादेव बनकर, दीपक नेहालसिंग जारवाल, निवृत्ती चंदर देशमुख, बालाजी बापुसाहेब शिंदे व मनेष आत्माराम नवले अश्या 7 जणांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या असुन या सर्वांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकारी यांच्या पाठिंब्याने कॅम्प लावुन नोंदणी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
धाराशिव – कळंब विधानसभा मतदार संघांचे प्रमुख ऍड दत्तात्रय देवळकर व जिल्हा सरचिटणीस ऍड नितीन भोसले यांनी लेखी तक्रार केली आहे तर धाराशिव शहरातील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक उजमा सबा अझहर पठाण यांच्या कार्यायात बसून बीएलओ नोंदणी करतानाचा व्हिडिओ निजाम नदाफ यांनी शेअर केला आहे. या प्रकरणाची दखल घेत आता कारवाईला सुरुवात झाली आहे.
सय्यद यांनी भाग यादीमधील 964 मतदारांपैकी केवळ 520 मतदारांना फॉर्म वितरण केल्याचे दिसन येते. अद्यापी तब्बल 444 मतदारांना फॉर्म वाटप केले नाही. 15 दिवसांनंतरही फॉर्म वितरणच्या कामाची टक्केवारी ही केवळ 53.94% इतकीच आहे. केवळ 64 मतदारांचेच फॉर्म डिजीटालायझेशेन केलेले दिसून येते. त्यामुळे तालुक्याचे कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. धाराशिव तालुक्याची फॉर्म वितरणच्या कामाची टक्केवारी ही अतिशय कमी असल्याने जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठकीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.
राज्यामध्ये 20 जुन पासुन मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) चालु झालेला असुन मतदाराचे मॅपिंग बाबतचे कामकाज पूर्ण करण्याच्या अनुषंगाने फॉर्म वाटप केले होते व संबंधित मतदाराचे घरी जाऊन त्यांची पडताळणी करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते मात्र तसे केले नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 मधील कलम 32 मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1971 सेवा व वर्तणुक मधील तरतुदीनुसार कारवाईचा इशारा दिला आहे.
प्रत्येक मतदाराचे घरी जावून त्यांचेकडून फॉर्म भरून घेवून बीएलओ ऍपमध्ये त्यांचा फोटो अपलोड करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना होत्या मात्र या बीएलओ यांनी राजकीय पदाधिकारी यांच्या पाठिंब्याने कॅम्पमध्ये नोंदणी केली, याची गंभीर दखल घेतली असुन कारणे दाखवा नोटीस बजावली असुन 24 तासात समक्ष हजर राहून खुलासा सादर ण केल्यास किंवा असमाधानकारक वाटल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.











