धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात सध्या टेंडर व लाडक्या ठेकेदार याच्यावरून बरीच चर्चा रंगत आहे. धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या रुग्णालय इमारत व वस्तीगृहाचे टेंडर तिसऱ्यांदा काढण्यात आले आहे. के एच ही कंपनी कागदोपत्री पात्र नसताना पात्र दाखवून तिला L1 ठरवून 299.50 कोटीला कंत्राट देण्याचा घाट रचला मात्र आमदार कैलास पाटील यांनी माहिती मागवताच ही प्रक्रिया थांबवून पुन्हा नव्याने निविदा काढण्यात आली.
‘टेंडर रत्न’ अशी ख्याती असलेल्या एका नेत्याचा यात सिंहाचा वाटा असुन या वादग्रस्त के एच कंपनीला तुळजापूर शहर व मंदीर संस्थान येथील कामे देण्याचा चंग बांधला होता. धाराशिव व तुळजापूर येथे ‘लाडका ठेकेदार’ जपणे हा आता छंद बनला आहे. नगर परिषद व आगामी काळात जिल्हा परिषदेत हाच विकासाचा पॅटर्न राबवीला जाताना दिसत आहे.
मेडिकल कॉलेजच्या इमारतीसाठी 285 कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. 430 बेडचे शासकीय रुग्णालय व 100 विद्यार्थीकरीत वसतिगृह आणि कर्मचाऱ्यां करीता निवासस्थानाचे बांधकाम प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडुन महाराष्ट्र राज्य ऑनलाईन ई निविदा प्रणालीव्दारे नोंदणीकृत आणि अनुभवी कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. 25 जुन ते 8 जुलै या दरम्यान निविदा भरता येणार आहे.
खंडोबा बिरादार यांच्या के एच कॅन्स्ट्रकशन छत्रपती संभाजीनगर ह्यांना तुळजापूर नगर परिषद निवडणुकीपुर्वी 2024 मध्ये नगरोत्तथान अंतर्गत 156 कोटी रुपयांचे काम दिले होते, त्यावेळी 2 निविदा आल्या होत्या. 5 टक्के कमी दराने काम केले. त्यांना 15 कोटी ऍडव्हान्स देण्यात आला. त्यांनी 30-35 कोटीचे काम केले त्यांना त्याचे बील सुद्धा देण्यात आले मात्र त्यांनी काम बंद केले, गेली दीड वर्षापासुन काम बंद आहे. सगळी यंत्रणा घेऊन ते निघुन गेले. 156 कोटी रुपयांचे काम घेण्यासाठी अनेक बोगस कागदपत्रे जोडली आहेत, देय बँक व्यवहार पुरावा नाही, सारा सोबत केलेले पोट करार नाही. राजकीय दबावापोटी काम मंजुर करून देण्यात आले असं आरोप ऋषी मगर यांनी केला आहे.











