धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेला निजाम सरकारने दिलेल्या इनामी जमिनीत घोटाळा झाल्याचा आरोप मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी केला असुन याअनुषंगाने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना समिती नेमून चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीला निजाम सरकारने दिलेल्या इनाम जमिनी नियमबाह्यरीत्या खासगी व्यक्तींच्या नावे हस्तांतरित झाल्या आहेत. याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे नोंदविण्याची मागणी मंदिर महासंघाने केली आहे.
तत्कालीन निजाम शासनाने श्री तुळजाभवानी देवी मंदिरास सुमारे 4 हजार 121 एकर जमीन इनाम म्हणून दिली होती. कायद्यानुसार या जमिनीची खरेदी-विक्री होऊ शकत नाही. याला ‘कुळ कायदा’ ही लागू होत नाही. असे असतानाही तत्कालीन महसूल अधिकारी आणि अन्य व्यक्तींच्या संगनमताने हजारो एकर जमीन लाटण्यात आल्याचा मंदिर महासंघाचा आरोप आहे.
श्री तुळजाभवानी संस्थानच्या नावे कागदोपत्री 3 हजार 397 एकर भूमी असताना प्रत्यक्ष ताबा मात्र 4 मठांमधील खासगी व्यक्तीकडे आहे. तसेच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली 403 एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खासगी व्यक्तींच्या नावे करण्यात आली. हस्तांतरणात सामील असलेले तत्कालीन उपजिल्हाधिकारी, विश्वस्त आणि संबंधित लोकांवर तातडीने गुन्हे दाखल व्हावेत.
कायद्याचे उल्लंघन करून 63.03 एकर जमिनीपैकी काही जमीन ‘संरक्षित कुळ’ दाखवून अनधिकृतपणे विकण्यात आली आहे. एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत 261 एकर जमीन तब्बल 73 खासगी व्यक्तींच्या नावे 7/12 वर नोंदवली. याशिवाय, अपसिंगा आणि उपळा या गावांमधील 158 एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आल्याचा दावा मंदिर महासंघाचा आहे.











