धाराशिव – समय सारथी
उस्मानाबाद – लातूर व बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची चाहूल लागताच भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र तथा सहकार क्षेत्रातील चेहरा म्हणून ओळख असलेले सुनील मधुकरराव चव्हाण यांनीही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उस्मानाबाद – लातूर व बीड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींची संख्या मोठी आहे. त्यामुळे भाजप या निवडणुकीकडे प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहत असून उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे.
मागील विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना निवडून आणण्यात सुनील चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऐन लोकसभा निवडणुकीत सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पूर्ण ताकदीने प्रचारात सहभाग घेतला होता. 2024 च्या विधान सभा निवडणूक मध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या निवडणुकीतही त्यांनी सक्रिय भूमिका निभावली होती. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले.
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे जिल्हाभर असलेले कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि सहकार क्षेत्रातील प्रभाव भाजपसाठी आजवर सुनील चव्हाण यांच्या रूपाने फायद्याचा ठरला आहे. त्यांना संधी दिल्यास ग्रामीण भागात पक्षाला अधिक बळ मिळू शकते, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
सुनील चव्हाण हे अणदूर येथील रहिवासी असून सहकार क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना, नळदुर्ग येथे त्यांनी संचालक आणि अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली आहे. त्यामुळे सहकार आणि स्थानिक राजकारणातील त्यांचा संपर्क मजबूत मानला जातो.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, माजी मंत्री बसवराज पाटील यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केंद्रात, राज्यात तसेच जिल्हा परिषद आणि अनेक नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता असल्याने पक्ष कोणत्या चेहऱ्यावर विश्वास दाखवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमेदवाराला संधी दिल्यास जिल्ह्यात भाजपाला आणखी राजकीय बळ मिळेल, असा सूर भाजप कार्यकर्त्यांतून उमटत आहे. त्यामुळे उमेदवारीचा अंतिम निर्णय व कौल पक्षश्रेष्ठी कोणाच्या बाजूने देतात, याची कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.












