राजपत्रात अधिसुचना प्रसिद्ध तरीही खरेदी – पतीला दिला लाभ, पदाचा दुरुपयोग, कारवाईची मागणी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक व भुसंपादन अधिकारी शिल्पा करमरकर यांचा आणखी एक भुसंपादन घोटाळा समोर आला आहे. भुसंपादनाची प्रक्रिया सुरु होऊन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर खरेदी विक्री व्यवहारास प्रतिबंध असतानाही शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात खरेदी करण्यात आल्या व त्याच जमिनीचे भुसंपादन करून करोडो रुपयांचा मावेजा घशात घालण्यात आल्या.
धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर- रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गा क्रमांक 361च्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया 27 मार्च 2024 रोजी सुरु होऊन 3(अ) ची अधिसुचना 26 ऑक्टोबर 2015 रोजी भारत राजपत्रात प्रसिध्द झाली. अधिसुचना प्रसिध्द झाल्यानंतर खरेदीविक्री व्यवहारास प्रतिबंध असताना देखील करमरकर व पाठक यांच्या नातेवाईक यांनी जमिनी खरेदी करून तिथे करोडो रुपयांचा शासकीय मावेजा उचलला.
श्रीमती शिल्पा करमरकर यांनी त्यांचे पती उमेश पांडुरंग उणकल ( सोलापूर ) व त्याचे नाशिक येथील सीए पंकज व्यंकटराव देशपांडे यांच्या नावे 1 फेब्रुवारी 2016 रोजी ताकविकी गावातील गट क्रमांक 173 मध्ये 83 आर जमीन मिलींद सोमनाथ डीकोळे व शिवाजी महारुद्रा पात्रे यांच्याकडुन 19 लाखात खरेदी केली तर पाठक यांचे नातलग सुमेध पाठक, प्रणव पाठक (तुळजापूर), व्यंकटेश देशमुख व कृष्णा देशमुख (मुंढवा, पुणे) यांच्या नावे 18 मार्च 2016 रोजी ताकविकी शिवारातच गट क्र 172 मध्ये 2 हेक्टर 29 आर इतकी जमीन 10 लाख 90 हजारांत खरेदी केली.
3(अ) ची अधिसुचना भारत राजपत्रात प्रसिध्द झाल्या नंतर खरेदीविक्री व्यवहारास प्रतिबंध असताना ह्या जमिनी संपादित करण्यात आल्या, 15 जानेवारी 2016 रोजी भुसंपादन मोजणीसाठी एनएचएआयच्या ( NHAI ) प्रकल्प संचालक यांना लेखी पत्र देण्यात आले त्यानंतर सीमा अंतीम झाल्या आणि काही दिवसातच पाठक व करमरकर यांनी त्यांच्या पती व नातेवाईक यांच्या नावाने जमिनी खरेदी केल्या.
एरव्ही सात बारा उताऱ्या नोंद घेण्यासाठी अनेक महिने लागतात मात्र उणकल व देशपांडे यांनी जमीन खरेदी करताच तात्काळ नोंदी घेण्यात आल्या, त्यांच्या 83 आर पैकी 17 गुंठे जमीन संपादित करून 46 लाखांचा मावेजा देण्यात आला तर पाठक यांच्या 2 हेक्टर 29 आर पैकी 18 गुंठे जमीन चौपदरीकरणात संपादित होऊन 49 लाखांचा मावेजा देण्यात आला.
आर्थिक फायदा मिळवण्यासाठी संगणमत करून करोडो रुपयांचा मावेजा उचलण्यात आला, हा प्रकार शासनाची फसवणूक करणारा आहे. पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा नोंद करून रक्कम वसुलीची कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
बीड जिल्ह्यात सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या 73 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्यात पाठक हे आरोपी आहेत. 154 प्रकरणांमधील वाढीव मोबदला मंजुर करण्यात आला, तब्बल 241 कोटी 62 लाख रुपयांनी वाढवण्यात आला असा आरोप आहे, त्यांना पोलिसांनी अटक करून 7 दिवसांच्या कोठडीनंतर ते आता बीड जिल्हा कारागृहात आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसपी सचिन पांडकर, व्यंकटराम या अधिकारी यांची टीम तपास करीत आहे. पाठक यांचे आर्थिक व्यवहार व इतर बाबी रडारवर आहेत, त्यांनी अनेक ठिकाणी नातेवाईक यांना भुसंपादन लाभ दिल्याचा आरोप आहे, त्यातच करमरकर यांचे हे प्रकरण समोर आले आहे, त्या सध्या लातुर अपर जिल्हाधिकारी आहेत.











