धाराशिव – समय सारथी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी व कट रचल्याच्या प्रकरणात लातुर कोर्टात 20 मे रोजी सुनावणी होणार असुन या गुन्ह्यातील आरोपी सतीश मंदाडे हा लातुर पोलिसांना सापडेना असेच झाले आहे. कोर्टाने त्याच्या विरोधात वॉरंट काढले आहे. गेली 17 वर्षांपासून या प्रकरणात काहीही झालेले नाही. दरम्यान कै पवनराजे हत्याकांड खटल्यात सुनावणी पुर्ण झाली असुन 16 जुन रोजी कोर्ट निकाल सुनावणार आहे, याचं हत्याकांडात हजारे प्रकरण उघड झाले होते.
29 सप्टेंबर 2009 रोजी हत्येची सुपारी व कट रचल्याचा गुन्हा अण्णा हजारे यांनी लातुर एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केला त्यानंतर तब्बल 10 वर्षाने सीआयडीने राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, मोहन अनंत शुक्ला व सतीश रानबा मंदाडे यांच्या विरोधात लातुर कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. 2022 पासुन या प्रकरणात चार्ज फ्रेम ( आरोप निश्चिती प्रक्रिया ) न झाल्याने प्रत्यक्ष सुनावणीला ( साक्षी व पुरावे) सुरुवात झालेली नाही. 4 वर्षापासुन चार्ज फ्रेम झाला नसुन तारीख पे तारीख सुरु आहे.
डॉ पाटील व शुक्ला हे वेगवेगळी कारणे देऊन सुनावणीस गैरहजर राहत हजेरी माफिचा अर्ज देत आहेत तर मंदाडे याच्या विरोधात कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे मात्र तो गेली दीड वर्षापासुन पोलिसांना सापडेना झाला आहे. ऍड मोहन जाधव हे तिघांच्या वतीने कोर्टात वकील आहेत. कै पवनराजे दुहेरी हत्याकांडातील माफीचा साक्षीदार पारसमल ताराचंद बादला ( जैन ) याने कोर्टात सीआरपीसी 164 च्या नुसार न्यायाधीश एस बी महाले यांच्यासमोर जबाब दिला. त्यात त्याने अण्णा हजारे यांची हत्या करण्यासाठी 30 लाखांची सुपारी दिली मात्र ती नाकारल्याचा खुलासा केला.
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा भ्रष्टाचार व गैरव्यवहार मी उघडकीस आणल्याने न्यायमूर्ती पी बी सावंत आयोगाच्या चौकशी वरून डॉ पदमसिंह पाटील यांना राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून पायउतार व्हावे लागले होते त्यामुळे त्यांचे मनात माझे विषयी रोष निर्माण झाला होता त्यातूनच त्यांनी कट रचून सुपारी दिल्याची तक्रार केली.
सीआयडीने या प्रकरणात 2009 ते 2018 या 9 वर्षात कोणताच तपास न केल्याचे माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीत (आरटीआय) उघड झाले. पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र डॉ जयराजे निंबाळकर यांनी अण्णा हजारे हत्या कट व सुपारी प्रकरणातील तपासाची माहिती मागवली होती त्यात हा खुलासा झाला, त्यानंतर सीआयडीने 2019 मध्ये दोषारोपपत्र पाठवले, त्यानंतर 28 एप्रिल 2022 पासुन गेली 4 वर्ष तारीख सुरु आहे. पवनराजे हत्याकांडात तब्बल 14 वर्ष कोर्टात सुनावणी चालली.











