बीड – समय सारथी
73 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची 7 दिवसांची पोलिस कोठडी आज संपणार असुन त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. पाठक यांना वाढीव कोठडी मिळणार की जेलमध्ये रवानगी याचे चित्र स्पष्ट होणार असुन पोलिसांना महत्वाचे पुरावे व धागेदोरे मिळाले असल्याची सुत्रांची माहिती आहे. पाठक व त्यांच्याशी संबंधित असलेले व्यक्ती व त्यांचे आर्थिक व्यवहार रडारवर असुन इतर प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे.
पाठक यांच्या लातूर येथील निवासस्थानी 2 तासापेक्षा जास्त झाडाझडती घेऊन लॅपटॉप, टॅब अन् मोबाइल असे डिजिटल पुरावे जप्त केले असुन या वस्तु फॉरेन्सिक तपास व डेटा मिळवण्यासाठी मुंबईला पाठवण्यात आल्या आहे. भुसंपादन मावेजा घोटाळ्याशी संबंधित एकूण 154 संचिकांपैकी 148 फाईल्स पोलिसांच्या हाती लागल्या असुन 6 संचिका गहाळ आहेत, पोलिसांनी हस्तगत केलेल्या 3 फाईल्स अत्यंत महत्त्वाच्या असून, त्या न्यायाधीशांकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. 241 कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप असुन त्यातील 73 कोटी वितरित केल्याने गुन्हा नोंद आहे.
पाठक यांची मालमत्ताही आता रडारवर आली आहे. घोटाळ्याच्या काळात त्यांच्या खात्यांवर अथवा कुटुंबीयांच्या खात्यांवर काही संशयास्पद व्यवहार आहेत का, याचीही पडताळणी केली जात आहे. वॉईस रेकॉर्डंगमध्ये नाव आलेले 2 उपजिल्हाधिकारी आणि 1 टेझरी ऑफीसर संपर्काबाहेर असल्याचे सांगण्यात येते. भूसंपादनाचे सर्व बनावट आदेश पाठक यांनी स्वताच्या लॅपटॉपवरूनच तयार केल्याचा युक्तिवाद तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी न्यायालयात केला होता.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसपी सचिन पांडकर, व्यंकटराम या अधिकारी यांची टीम तपास करीत असुन पोलिसांनी लॅपटॉप व इतर पुरावे गोळा केले आहेत. 7 दिवसांच्या पोलिस कोठडीत काय निष्पन्न झाले हे पोलिस आज कोर्टात मांडणार आहेत, आजची सुनावणी महत्वाची असणार आहे.












