धाराशिव – समय सारथी
तुळजापूरचे नेते देवानंद भाऊ रोचकरी यांना सुप्रीम कोर्टात दिलासा मिळाला असुन कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत काही अटी व शर्थीवर तात्पुरता अंतरीम जामीन मंजुर केला आहे, या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 मे रोजी होणार आहे. तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे यांना शासकीय कार्यालयात घुसून मारहाण केल्याच्या प्रकरणात त्यांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने 1 वर्षाची शिक्षा व दंड सुनावला होता, त्यानंतर त्यांची रवानगी हर्सूल जेलमध्ये करण्यात आली होती. रोचकरी यांनी सुप्रीम कोर्टात अपील केले, त्यात त्यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांची जेलमधुन मुक्तता करण्यात आली.
तुळजापूर नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ पंकज जावळे यांना 15 मे 2007 रोजी नगर परिषद कार्यालयात जाऊन मृत्यू प्रमाणपत्र व ठेकेदारीचे बील यावरून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी देवानंद रोचकरी यांच्यासह अन्य जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता, त्यात त्यांना धाराशिव कोर्टाने 22 डिसेंबर 2015 रोजी कलम 332 साठी 1 वर्षाची शिक्षा व 10 हजारांचा दंड तर कलमं 504 साठी 3 महिने शिक्षा व 5 हजार दंड ठोठावला होता, शिक्षेनंतर जामीन मिळाल्यानंतर रोचकरी यांनी जानेवारी 2016 मध्ये छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात शिक्षेविरोधात अपील केले होते मात्र कोर्टाने शिक्षा कायम ठेवली.
धाराशिव येथील तत्कालीन विशेष न्यायाधीश एस आय पठाण यांनी दिलेला निकाल योग्य असुन तो कोर्टाने कायम ठेवत अपील फेटाळून लावले होते. सुप्रीम कोर्टात रोचकरी यांच्या बाजुने ज्येष्ठ विधीज्ञ ऍड निशांत कटनेश्वरकर यांनी बाजु मांडली. रोचकरी यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आनंद साजरा केला.











