धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी येथील मिलन लॉजवरील बांगलादेशी महिला व वेश्या व्यवसाय प्रकरणात 2 आरोपीना 3 दिवसांची वाढीव पोलिस कोठडी मिळाली असुन काही आरोपीची नावे निष्पन्न झाली आहेत. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरु असुन काही जन रडारवर आहेत. 2 बांगलादेशी महिला सापडल्याने असल्याने यांचे गांभीर्य वाढले आहे, या सेक्स रॅकेटचे सोलापूर कनेक्शन असुन त्या इथपर्यंत कोणामार्फत आल्या याचा तपास सुरु आहे.
दिलीप सिद्धाप्पा मंगरुळे (वय 43, रा. अविनाश नगर, एमआयडीसी सोलापूर) व संतोष नामदेव पवार (वय 40, रा. तिऱ्हे, ता. उत्तर सोलापूर) या दोघांना अटक केली आहे, त्यांना कोर्टाने वाढीव पोलिस कोठडी दिली आहे. मोबाईल, पिग्मी पासबुक, नोंदीचे रजिस्टर, यूपीआय स्कॅनर मशीन जप्त केली असुन तपास सुरु आहे. पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली यातून स्थानिक पोलिसांचे अपयश दिसुन येते, पाठबळ असल्याचा आरोप होत आहे.
तामलवाडी हे धाराशिव जिल्ह्याचे प्रवेशद्वार असुन इथून अनेक बाबी समोर येतात. एक ‘झिरो’ पोलिस ‘हिरो’ बनला असुन गेल्या दशकापासुन कारभारी आहे. अधिकारी कर्मचारी बदलले तरी तिथला कारभार व चाव्या याच्या हाती असल्याने अनेक अवैध धंद्याना अभय मिळत आहे, दादा पॅटर्नमुळे आता चलती असुन पाळेमुळे मजबूत झाली आहेत. यापुर्वी काही अधिकारी लाचलुचपतसह अन्य प्रकरणात गोत्यात आले होते. अवैध धंदे सुरु करण्यापुर्वी झिरोची नाहरकत घ्यावी लागते हा इथला दंडक बनला आहे. काही कर्मचारी सुद्धा याला वैतागले असुन विरोध केल्यास बदलीच्या ‘बक्षीसी’ची तंबी दिली जाते.
मिलन लॉज सील करून संपत्ती जप्तीची कारवाई पोलिस व महसूल विभागाकडून होणे अपेक्षित आहे. स्थानिक भागीदार व वसुलीदार कोण ? या व्यवसायाला वरदहस्त व अभय कोणाचे ? हा प्रश्न यानिमित्ताने समोर आले आहेत. तामलवाडी येथील एक गावपुढारी याच्या आशीर्वादामुळे हा व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याची माहिती आहे. या साखळीतील दलाल व लॉजवर आलेल्या लोकांची नावे तपासली जात असुन ते कारवाईच्या रडारवर आहेत.
तामलवाडी येथील मिलन लॉजमध्ये काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी छापा टाकून 3 पिडीत महिलांची सुटका केली. तामलवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध बीएनएस कलम 143, 144, 3(5) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3, 4, 5 अन्वये गुरनं 60/2026 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











