धाराशिव – समय सारथी
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या माध्यमातून व संकल्पनेतुन धाराशिव जिल्ह्यात विकासाच्या विविध योजना मांडल्या जात आहेत. धाराशिव तालुक्यातील कौडगाव येथे डिफेन्स हब तयार होणार असुन त्या ठिकाणी उर्वरीत जागेत गवतापासुन बायोगॅस तयार करण्याचा प्रकल्प साकारला जाणार आहे, त्यामुळे शेतकरी यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.
नैसर्गिक खत यासह अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत, यानिमित्ताने आमदार पाटील यांच्याकडे ‘विकास मेरू’ रूपाने पाहिले जात असुन शेतकरी व सर्वसामान्य मोठ्या अपेक्षा करीत आहेत. धाराशिव हा दुष्काळग्रस्त असुन इथे दुभत्या जनावर यांना खायला पर्याप्त गवत मिळत नाही, ओसाड माळरानात शेतात कुसळे आहेत अश्या ठिकाणी हा प्रकल्प यशस्वी होणार आहे, हे दिव्य विशेष ठरणार आहे. थोडक्यात माळरानात नंदनवन फुलवणार आहेत.
वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर ‘ग्लोब फोर्ज लिमिटेड’ अर्थात पूर्वीची निबे लि. या नामांकित कंपनीने कौडगाव एमआयडीसीत पहिल्या टप्प्यात तब्बल अंदाजे 2 हजार कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पामुळे जिल्हयातील 3 हजार पेक्षा अधिक तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
हा प्रकल्प केवळ कारखानदारीपुरता मर्यादित नसून तो शेती आणि तंत्रज्ञान यांचा संगम आहे. या ठिकाणी दोन प्रमुख प्रकल्प आकारास येणार आहेत. पहिल्या टप्प्यात कौडगाव एमआयडीसीतील 1 हजार एकर जागेवर संरक्षण दलासाठी आवश्यक असलेले टीएनटी (TNT) आणि प्रपोलेंट तयार केले जातील. धाराशिवमध्ये ‘मिसाईल्स’ आणि संरक्षण साहित्य तयार करण्यासाठी मोठा प्रकल्प साकारणार आहे.
कौडगाव या ठिकाणी नेपियर ग्रासवर आधारित सीबीजी (कॉम्प्रेसड बायोगॅस) प्लांट उभारला जाणार आहे. याला लागणारे गवत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून घेतले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे तसेच नैसर्गिक खत देखील उपलब्ध होणार आहे.यात तयार होणारा सीबीजी आणि खत जिल्ह्यातच देण्याबाबत कंपनी सोबत ठरले आहे असे आमदार पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कंपनीचे प्रमुख गणेश निबे यांच्याशी 8 एप्रिल 2015 रोजी पहिली भेट झाली होती. त्यांनी 1 हजार एकर जागेची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांना जिल्ह्यातील कौडगाव, होर्टी, माळुंब्रा, अपसिंगा अशा विविध जागा दाखवल्या होत्या. अखेर त्यांनी कौडगाव एमआयडीसी येथील जागेवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा आत्या पवार ,उद्योगमंत्री उदय सामंत व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने धाराशिव आता प्रगतीच्या महामार्गावर आहे. भविष्यात देशाला संरक्षण साहित्य पुरवणारा जिल्हा म्हणून धाराशिव जिल्ह्याचा नावलौकिक झाल्याशिवाय राहणार नाही. धाराशिवच्या औद्योगिक विकासाचा हा ‘श्रीगणेशा’ असून, येणारा काळ आपल्या जिल्ह्यासाठी समृद्धीचा आणि प्रगतीचा राहणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले आहे.












