धाराशिव – समय सारथी
धाराशिव आणि अहिल्यानगरच्या विकासाला नवी गती देणारी अत्यंत सुखद बातमी असुन कौडगाव परिसरात ग्लोब फोर्ज लिमिटेड (पूर्वीची निबे लि.) तब्बल 15 हजार 430 कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक करून संरक्षण क्षेत्रातील मोठा उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. मंत्री मंडळ समितिने घोषणा करताच आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी कंपनीचे संचालक गणेश निबे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या कृपाआशीर्वादाने आणि आजवर केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी धाराशिव जिल्ह्यात हजारो कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्लोब फोर्ज लिमिटेडच्या संरक्षण प्रकल्पामुळे आपल्या जिल्ह्यातील हजारो युवकांच्या रोजगाराचे स्वप्न साकार होणार आहे अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
धाराशिव आता केवळ शेतीसाठीच नाही, तर ‘संरक्षण उत्पादन केंद्र’ म्हणून ओळखले जाईल. कौडगाव परिसरात ग्लोब फोर्ज लिमिटेडच्या माध्यमातून येणारा हा प्रकल्प जिल्ह्याचे चित्र बदलवून टाकणारा ठरेल. स्थानिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणि जिल्ह्याला प्रगत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. या महत्वपूर्ण प्रकल्पासाठी पुढाकार घेतल्याबद्दल गणेश निबे यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उद्योगमंत्री उदयजी सामंत यांचे आभार मानले.












