धाराशिव – समय सारथी
धाराशिव व अहिल्यानगर जिल्ह्यात ग्लोब फोर्ज लिमिटेड ही कंपनी 15 हजार 430 कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक करणार असुन यातून 3 हजार 600 रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीने याला मान्यता दिली आहे, विशेष म्हणजे डिफेन्स हब व त्याच्याशी निगडीत उद्योग बाबत धाराशिव जिल्ह्यातुन कोणतीही मागणी नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष दिले. धाराशिव अकांक्षीत जिल्हा असलेल्या मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन निर्णय घेतल्याने नागरिकांकडुन त्यांचे अभिनंदन होत आहे. हा प्रकल्पबाबत जिल्हा प्रशासनाकडेही ठोस माहिती नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील 18 प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. विविध कंपन्या राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यात 18 प्रकल्पात 2 लाख 56 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे. तांत्रिक नवकल्पना, संशोधन विकास आणि पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ पी अनबलगन, एमआयडीसीचे सीईओ पी वेलारासू तसेच विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.
ग्लोब फोर्ज लिमिटेड (Globe Forge Limited) ही 2024 साली स्थापन झालेली कंपनी संरक्षण क्षेत्रात आणि फॅब्रिकेटेड मेटल उत्पादनात काम करते. त्यांनी शिर्डी येथील सावळी विहीर एमआयडीसी येथे 4 लाख चौ मी क्षेत्रावर तोफ गोळे आणि आधुनिक संरक्षण उपकरणे बनवणाऱ्या कारखान्याचे उद्घाटन केले आहे, तिथे आधुनिक तोफ गोळे (Empty Shells) आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांच्या निर्मितीसाठी कारखाना उभारला जात आहे. या कंपनीचे पूर्वीचे नाव NIBE ORDNANCE ग्लोबल लिमिटेड असे होते.155 मिमी पर्यंतच्या तोफ गोळ्यांच्या रिकाम्या शेलची निर्मिती ही कंपनी करते.
‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’ अभियानांतर्गत संरक्षण क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. हा प्रकल्प प्रत्यक्ष सुरु झाल्यावर धाराशिव संरक्षण उत्पादनाचे एक महत्त्वाचे केंद्र (Defence Hub) म्हणून विकसित होणार आहे.












