धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी मंदीर संस्थानने केलेले नियम डावलून 6 वी सिंहासन पुजा करण्यात आल्याने पुजारी अभिजीत कुतवळ पाच वर्षे मंदिर प्रवेश बंदी व खासगी सुरक्षा रक्षक कंपनीस 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पुजारीवर कारवाई व सुरक्षा कंपनीला दंड ठोठावला असला तरी मंदीर धार्मिक व्यवस्थापक व इतर अधिकारी यांना तूर्तास कारवाईत अभय देण्यात आले. या प्रकरणात कारवाईला राजकीय किनार असल्याचा आरोप होत आहे. आगामी काळात यासह, व्हीआयपी पासचा मुद्दा चांगलाच तापणार आहे अनेक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी दररोज सकाळी 5 सिंहासन पूजा व सायंकाळी 2 सिंहासन पूजा घालण्याचा नियम आहे. तीन सुरक्षा निरीक्षक व तीन सहायक सुरक्षा निरीक्षक, तीन धार्मिक व्यवस्थापक आदींसह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उपस्थितीत हा प्रकार घडला.
तुळजाभवानी मातेचा मूर्तीची झीज रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने अभिषेक पुजा व सिंहासन पुजेच्या संख्येवर निर्बंध घातले आहेत. मात्र 21 एप्रिल रोजी मंगळवारी सकाळचा 5 सिंहासन पूजेचा नियम मोडीत 6 वी सिंहासन पूजा करण्यात आली. सिंहासन पुजासाठी 2 महिने प्रतीक्षा असल्याने हा प्रकार घडला.
मंदीर संस्थानने संबंधित पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करत 5 वर्षे मंदिर प्रवेश बंदची कारवाई केली आहे. मंदिरातील खासगी सुरक्षा रक्षक कंपनीला 1 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. मंदिर संस्थानच्या सुरक्षा निरीक्षकांकडून लेखी खुलासा मागवण्यात आला आहे. त्यानंतरच सुरक्षा निरीक्षकांवर कारवाई करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया तहसीलदार तथा मंदीर व्यवस्थापक माया माने यांनी दिली.
मूर्तीची झीज रोखण्यास पुरातत्व विभागाने कडक नियम केले आहेत. शुध्द हळदीचे कुंकू, दही वापरणे, मुलायम ब्रश वापरणे, मुलायम कापड वापरणे, अभिषेक पूजेवेळी मूर्तीवर चांदीचे आवरण घालणे, अभिषेक पूजेचा संख्येवर निर्बंध घालणे, मूर्तीच्या पायावर चांदीचे आवरण घालून पायावरच अभिषेक पूजा करणे आदी नियम आहेत.











