धाराशिव – समय सारथी
तुळजापूर शहरात नगर परिषदेने राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले असुन रस्त्यानी, चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे. तुळजाभवानी मंदिर परिसर व मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यासह अनेक ठिकाणी रस्ते, फुटपाथ वरील अतिक्रमण काढण्यात आल्याने हळुहळु ‘तुळजापूर शहर अतिक्रमण मुक्त’ होत आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू भाई गंगणे यांनी ही धाडसी मोहीम हाती घेतली, याचे सामान्य नागरिक व भाविकातुन कौतुक होत आहे.
तुळजापूर शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता, शहराचे बेहाल झाले होते त्यामुळे अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. ही मोहीम राबविण्यापुर्वी नगर परिषदेने अनेक संबंधितांना रीतसर लेखी नोटीस देऊन स्वतः अतिक्रमण काढून घ्यावे यासाठी काही दिवसांची मुदत दिली. अतिक्रमण न काढल्याने नगर परिषदेने थेट जेसीबी व पथक घेऊन कारवाईचा बडगा उगारीत अतिक्रमण काढण्याची मोहीम 2-3 दिवस राबवली. ज्यांची अतिक्रमणे काढली गेली त्यांनी नाराजी व्यक्त करीत आरोप प्रत्यारोप केले. त्यात काही राजकीय मंडळीनी उडी घेऊन टिकेची झोड उठवली मात्र अतिक्रमण काढणे गरजेचे होत, हे वास्तव आहे.
नगर परिषदेने दुजाभाव न करता अनेक ठिकाणी सरसकट कारवाई केली यातून एक सुचक व चांगला संदेश या मोहिमेतुन गेला. तुळजापूर शहराचा विकास करायचा असेल तर अतिक्रमण मुक्त होणे गरजेचे आहे. अनेक दुकानदार यांनी रस्त्यावर दुकाने थाटली होती तर काही ठिकाणी शासकीय जागावर, मुख्य चौक येथे मोकळ्या जागेत दुकाने सुरु केली होती. लाखो रुपयांचे भाडे देऊन दुकान घेऊन व्यापार करणाऱ्या काही लोकांना याचा त्रास होत होता, त्यांच्या दुकानासमोर हातगाडे, शेजारी टपरी टाकून व्यवसाय सुरु होता. अतिक्रमण व त्या माध्यमातून अर्थकारण ही एक मोठी साखळी असते ती मोडायला हवी.
‘अतिक्रमण मुक्त तुळजापूर’ हा नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचा निर्णय कौतुकास्पद असला तरी याची नियमित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे त्यासाठी मंदीर परिसरात स्थिर पथक नेमणेसह इतर उपाययोजना करणे गरजेचे आहे. दुजाभाव न करता नियमित कारवाई, व्यापारी व भाविकांना यांना मूलभूत सुविधा देणे गरजेचे आहे. धाराशिव शहरात सुद्धा अनेक ठिकाणी अतिक्रमण असुन मुख्य रस्त्याच्या शेजारी पत्र्याचे डबे मारून दुकाने थाटली आहेत. धराशिवमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम कधी ? याकडे लक्ष लागले आहे.











