देणगी दर्शन व धर्मदर्शन रांगेतील भेद संपला – आता सिंहाच्या गाभाऱ्यातूनच होणार देवीचे दर्शन
तुळजापूर – समय सारथी
श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, 18 जूनपासून मंदिरातील दर्शन व्यवस्थेत मोठा बदल लागू करण्यात येणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे देणगी दर्शन व धर्मदर्शन रांगेतील भाविकांना आता एकाच ठिकाणाहून आणि समान अंतरावरून आई तुळजाभवानीचे दर्शन घेता येणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या नव्या नियोजनानुसार 500 रुपये देणगी दर्शन पासधारक आणि रेफरल देणगी दर्शन पासधारक भाविकांना राजे शहाजी महाद्वार मार्गे प्रवेश दिला जाणार आहे. तर 200 रुपये देणगी दर्शन पासधारकांना बिडकर पायऱ्या मार्गे दर्शन मंडपाच्या पहिल्या मजल्यावरून प्रवेश दिला जाईल. धर्मदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन मंडपाच्या चौथ्या मजल्यावरून प्रवेश देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, दर्शन मंडपाच्या पहिल्या मजल्यावरील भुयारी मार्गात सर्व रांगा एकत्र करण्यात येणार असून, त्यानंतर सर्व भाविकांना समान पद्धतीने आणि एकाच मार्गाने श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला देणगी दर्शन व सामान्य भाविकांच्या दर्शनातील फरक आता संपुष्टात येणार आहे.
मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, पूर्वीच्या व्यवस्थेत देणगी दर्शन रांगेतील भाविकांमुळे धर्मदर्शन रांगेतील भाविकांना दर्शन घेण्यास अडथळे निर्माण होत होते. याशिवाय सिंहासन पूजा आणि अभिषेक पूजा सुरू असताना देणगी दर्शन रांग काही काळ थांबवावी लागत होती. मात्र नव्या व्यवस्थेमुळे देणगी दर्शन पासधारकांना अधिक सुलभ आणि अखंड दर्शन सुविधा उपलब्ध होणार आहे.
मुखदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची स्वतंत्र व्यवस्था कायम ठेवण्यात आली असून, सिंहासन पूजा व अभिषेक पूजेची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भाविकांना अधिक सुलभ, शिस्तबद्ध आणि समान दर्शन मिळावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, नव्या व्यवस्थेला भाविकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने सर्व भाविकांना नव्या दर्शन व्यवस्थेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.











