धाराशिव – समय सारथी
परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी पदे गेल्या चार वर्षांपासून रिक्त असल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी शाळेला कुलूप ठोकत ती बंद ठेवली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत असून, प्रशासनाकडून वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
शाळेतील रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आता आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून धाराशिव जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोर शेकडो पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
शिक्षकांसह इतर सर्व रिक्त पदे भरण्याबाबत आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. गेल्या चार वर्षांपासून रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याने गावात प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
दरम्यान, या संदर्भात 28 जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.












