मर्यादा पाळा, आम्ही संघर्ष केला – काहीचा ठरवून पराभव, नाराजीचा सुर, पक्षश्रेष्टीचे दुर्लक्ष, गटबाजी
धाराशिव – समय सारथी
भाजप नेते अनिल काळे यांच्या अपमान प्रकरणाचे पडसाद जिल्हाभरात उमटत असुन माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी प्रतिक्रिया देत काही बाबी मांडल्या. आम्ही सर्वांनी 30 वर्ष संघर्ष केला असुन कोणी पक्षाचा मालक होण्याचे प्रयत्न करू नये मान सन्मान घ्यावा व मर्यादा पाळाव्यात. एकाच घरात 2 संविधानिक पदे, स्वतःच्या कुटुंबासाठी पायघड्या मग कार्यकर्तेनी आयुष्यभर सतरंज्या उचलायच्या का ? मुख्य पदाधिकारी यांचे फोटो न टाकणे म्हणजे मनाचा कोतेपणा दर्शवितो मात्र त्याने फरक पडत नाही असे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना ते जसे वागत होते तसे इथे वागत आहेत मात्र हे जास्त काळ चालणार नाही. कार्यकर्ते पेक्षा वैयक्तिक समर्थक वाढविण्यावर व पोसण्यावर भर दिला जात आहे. काही जणांचा राजकीय प्रतिस्पर्धी नको म्हणुन ठरवून पराभव केल्याचा आरोप चालुक्य यांनी केली. जिल्ह्यात असलेल्या अंतर्गत नाराजीवर पक्षश्रेष्टीनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अनिल काळे यांच्या बाबतीत घडलेला प्रकार हा चुकीचा, निषेधार्य असुन पक्षात नवीन आलेल्या नेत्यांनी व पदाधिकारी यांनी जुन्या कार्यकर्ते यांचा सन्मान केला पाहिजे. अवमान यापुढे खपवून घेतला जाणार नाही, आम्ही पक्षात 25-30 वर्ष काम केले आहे, संघर्ष केला असुन आता सत्ता आल्यावर मागून आलेले लोक पक्षाचे मालक होत आहेत हे वास्तव आहे. काही लोकांनी त्यांच्या मर्यादा पाळाव्यात, आम्ही पक्ष म्हणुन त्यांना मान सन्मान देतो, त्यांना पक्षाचे नेते म्हणुन मान्य करतो मात्र वागणे चुकीचे आहे.
एकाच घरात दोन दोन संविधानिक पदे घेतली जातात असे म्हणत त्यांनी आमदार पाटील यांच्यावर टीका केली. स्वतःच्या कुटुंबासाठी पायघड्या घातल्या जातात, सामान्य कार्यकर्ते व इतर पदाधिकारी यांनी सतरंज्या उचलायच्या का असा सवाल त्यांनी करीत कार्यकर्ते यांच्या व्यथा मांडल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुळजापूर येथे आल्यावर त्यांच्या स्वागतासाठीच्या कमानी व बॅनरवर तत्कालीन जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांसह एकही नेत्याचा फोटो नव्हता. यावर बोलताना चालुक्य म्हणाले की, कोण कोणाचा फोटो टाकावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मागे सुद्धा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी जिल्ह्यातील नेत्यांचे फोटो टाकले नाहीत. काही वेळा तर पंतप्रधान, राष्ट्रीय अध्यक्ष व ज्या पक्षाने आमदार केले त्यांचे पक्ष चिन्ह सुद्धा नव्हते. फोटो नसल्याने कार्यात काही फरक पडत नाही मात्र त्यांच्या मनाचा कोतेपणा दिसुन येतो असे म्हणाले.
वागणे, कार्यपद्धती व काही बाबीत पटत नसल्याने अनेक महत्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे पक्ष संघटनेपासून लांब चालले आहेत. ज्या राणाजगजीतसिंह पाटील यांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते यांनी एकेकाळी संघर्ष केला, ती व्यक्ती भाजपात आल्यावर आम्ही मोठ्या मनाने स्वागत करीत स्वीकारले व मान सन्मान केला मात्र त्याच्यात सुधारणा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते कार्यरत होते तिथली कार्यपद्धती व वागणे, संस्कृती इथे भाजपात रुजवीत आहेत, हे चालणार नाही असे चालुक्य म्हणाले.
बूथ जितेगा तो देश जितेगा अशी संकल्पना भाजपाची आहे मात्र सध्या बूथ पातळीवरील कार्यकर्ते नाराज करण्याचे काम सुरु आहे, नवीन नियुक्ती करताना स्वतःचे पूर्वीचे समर्थक यांना प्राधान्य देत पक्ष काबीज करण्याचे प्रयत्न होत आहेत. भाजप कार्यकर्ता पेक्षा व्यक्ती केंद्री राजकारण व वयक्तिक समर्थक वाढविण्यावर व पोसण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेला काही जणांना उमेदवारी दिली मात्र भविष्यात अडचण व स्पर्धक नको म्हणुन त्यांचा ठरवून पराभव केला व बंदोबस्त केला असा गंभीर आरोप केला.
बोलण्यासारख्या अश्या अनेक बाबी असुन योग्य वेळी त्या सर्वासमोर मांडू मात्र सामान्य कार्यकर्ते यांच्या व्यथेकडे पक्षश्रेष्टी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. आम्ही काळे यांच्या पाठीशी असुन असे प्रकार अनेक इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत घडले असल्याचे सांगितले. पक्ष संघटना वाढवायची म्हणुन सर्वांनी ते निमूटपणे गिळत शांत राहिले मात्र आता अतिरेक झाला असुन त्यांनी सुधारावे असा सल्ला दिला.











