धाराशिव – समय सारथी
राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या नियमाच्या निमित्ताने तुकाराम मुंडे यांनी एक शिस्त निर्माण केली आहे मात्र धाराशिव शहरात मात्र बोजवारा उडाला आहे. खाजा नगर, शम्स चौक, समता नगर, संभाजी नगर सांजा बाय पास रोड, समर्थ नगर, मिल्ली कॉलनी, शासकीय दुध डेअरी, बार्शी नाका परिसरासह अन्य ठिकाणी असलेली दुकाने रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत खुलेआम सुरु असतात. या भागात पान टपरी, हॉटेल, बेकरीसह अन्य दुकानामुळे रात्रीची टवाळखोरी वाढली असुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगर परिषद हद्दीत काही दुकाने रात्री 11 ते 11.30 च्या नंतर सुरु ठेवता येत नाहीत, सुरु ठेवल्यास परवाना निलंबित करण्यासह दंडात्मक कारवाईची तरतूद आहे मात्र यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. अन्न औषध प्रशासन, नगर परिषद, पोलिस व दुकाने नोंदणी विभाग यापैकी कोणीही, कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही. बार्शी नाका भागात पोलिस चौकी असतानाही कर्मचारी नसल्याने अनेक दुकाने रात्रभर सुरु असतात.
गुटखा बंदी असली तरी काही पान टपरीवर तो सर्रास मिळत आहे तर अनेक खाद्य पदार्थ हे गुणवत्ता वं नियमबाह्य पद्धतीने विकले जात आहेत. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढविणे व बंदोबस्त करणे गरजेचे आहे तर अन्न व औषध विभागासह दुकाने नोंदणी विभागाने बालकामगार अनुषंगाने तपासणी करण्याची मागणी होत आहे.











