धाराशिव – समय सारथी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने 65 उमेदवार यांची यादी जाहीर केली असुन धाराशिव कळंब मतदार संघांसाठी विद्यमान आमदार कैलास पाटील यांना तर भुम परंडा वाशी मतदार संघातुन माजी आमदार कै ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. परंडा या मतदार संघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत होणार असुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार राहुल मोटे यांचा यानिमित्ताने पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे. ज्ञानेश्वर पाटील यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे अर्थात मातोश्रीने आशीर्वाद देत पाठबळ दिले आहे.
परंडा मतदार संघात महायुतीकडुन शिवसेनेचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर धाराशिव मतदार संघात महायुतीचा उमेदवार अजुन जाहीर झाला नाही, इथेही धनुष्यबाण विरुद्ध मशाल अश्या लढतीची शक्यता आहे.
सलग 3 टर्म आमदार राहिलेले व त्यांनंतर 1 वेळेस विधानसभा लढविलेले राहुल मोटे यांना नाकारून रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. राहुल मोटे हे 2004, 2009, 2014 असे सलग 3 टर्म आमदार होते तर त्यांचे वडील महारुद्र बप्पा मोटे हे 1985 व 1990 असे 2 टर्म आमदार होते त्यानंतर 1995 व 1999 असे 2 टर्म ज्ञानेश्वर पाटील हे आमदार होते त्यांचे 3 ऑक्टोबर रोजी निधन झाले होते त्यांचे पुत्र रणजीत यांना उमेदवारी दिली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत परंडा मतदार संघात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे विक्रमी 32 हजार 902 मतांनी विजयी झाले होते त्यांनी सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. मोटे यांना 73 हजार 772 मते पडली होती तर सावंत यांना 1 लाख 6 हजार 674 मते पडली होती.
धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघात कैलास घाडगे पाटील यांना 87 हजार 488 मते पडली होती तर राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर यांना 74 हजार 21 मते पडली होती, कैलास पाटील हे 13 हजार 467 मतांनी विजयी झाले होते.