धाराशिव – समय सारथी
श्री तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (MSF) अधिकारी व जवानांचे पथक तैनात करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर MSF च्या अधिकारी व जवानांनी तुळजापूर शहर तसेच श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातून रूट मार्च काढला. रूट मार्चनंतर वरिष्ठ पोलीस व प्रशासनिक अधिकाऱ्यांनी MSF च्या अधिकारी व जवानांचे स्वागत करून त्यांना मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले. धाराशिवचे तत्कालीन पोलिस अधीक्षक तथा महामंडळाचे पोलीस उप महानिरीक्षक सचिन अशोक पाटील (DIG)यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत आहे.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर मनोहर पाटील, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, तुळजापूर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, मंदिर चौकीचे पोलीस निरीक्षक येवते तसेच MSF सुरक्षा अधिकारी प्रदीप पाटील, सहायक सुरक्षा अधिकारी रुपेश देशमुख, मंदिर सुरक्षा निरीक्षक विक्रम कदम, नवनाथ खिंडकर, ऋषभ रेहपांडे यांच्यासह पोलीस, मंदिर प्रशासन आणि मसफ चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी MSF च्या अधिकारी व जवानांचे स्वागत करून सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, भाविकांशी सौजन्याने वागावे आणि भाविकाभिमुख दृष्टिकोन ठेवून कर्तव्य बजावावे, अशा सूचना दिल्या. सुरक्षा व्यवस्थेत कोणत्याही चुकीच्या प्रवृत्तीला थारा देऊ नये, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी भाविकांमध्ये सुरक्षा यंत्रणेबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण झाले पाहिजे, असे नमूद केले. भाविकांशी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवून त्यांना सुरक्षिततेचा विश्वास देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर मनोहर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी देवीने प्रदान केलेल्या भवानी तलवारीचा उल्लेख करत, या पवित्र भूमीत कर्तव्य बजावण्याचे महत्त्व अधोरेखित केले. देवीचा आशीर्वाद घेऊन दररोज आपल्या कर्तव्याची सुरुवात करावी आणि भाविकांच्या सेवेसोबतच मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी निष्ठेने पार पाडावी, असा सल्ला त्यांनी MSFच्या अधिकारी व जवानांना दिला.
तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी श्री तुळजाभवानी देवी मंदिरातील प्रथा, परंपरा तसेच धार्मिक विधींची माहिती उपस्थित MSF अधिकारी व जवानांना दिली. मंदिरातील सुरक्षा व्यवस्था राबविताना मंदिराच्या धार्मिक प्रथा-परंपरांची जाणीव ठेवून भाविकांशी संयमाने व संवेदनशीलतेने वागण्याच्या सूचना दिल्या.
तुळजापूर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करताना सर्व भाविक वर्ग तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनाच्या वेळी आवश्यक ती सुरक्षा खबरदारी व नियोजन ठेवण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. मंदिर परिसरातील संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष देऊन पोलीस व MSF च्या जवानांनी परस्पर समन्वयाने कर्तव्य बजावावे, असेही त्यांनी सांगितले.
मंदिर चौकीचे पोलीस निरीक्षक येवते यांनी यावेळी मंदिर संस्थानकडून पोलीस प्रशासनाला वेळोवेळी मिळणाऱ्या सहकार्याचा उल्लेख केला. तसेच सलग सुट्ट्यांचे दिवस, सण-उत्सव तसेच इतर गर्दीच्या दिवशी मंदिर परिसरातील बंदोबस्त व कर्तव्य बजावताना आलेले अनुभव सांगत, अशा काळात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सतर्कता, संयम आणि परस्पर समन्वय ठेवून कर्तव्य बजावण्याबाबत मसफ च्या अधिकारी व जवानांना मार्गदर्शन केले.
116 MSF अधिकारी-जवानांचे सुरक्षा कवच
श्री तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे एकूण 116 अधिकारी व सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 6 अधिकारी असून, त्यापैकी 1 पोलीस निरीक्षक (PI), 4 पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि 1 सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) दर्जाचे अधिकारी आहेत. या पथकात काही महिला अधिकारी व सुरक्षा जवानांचाही समावेश आहे. MSF च्या अधिकारी व जवानांच्या तैनातीमुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता, गर्दी नियंत्रण, महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याची क्षमता अधिक बळकट होणार आहे.
MSF ला कायदेशीर अधिकार
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम, 2010 अंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा बलाची स्थापना करण्यात आली असून, सुरक्षा दलाच्या सदस्यांना कायद्यानुसार विशेष पोलीस अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच सुरक्षा कर्तव्य बजावताना त्यांना कायद्यानुसार विशिष्ट अधिकार व जबाबदाऱ्या प्रदान करण्यात आल्या आहेत. सुरक्षा कर्तव्य बजावताना अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करणे तसेच कायद्यात नमूद केलेल्या परिस्थितींमध्ये वॉरंटशिवाय संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करणे इत्यादी अधिकार MSF ला प्रदान करण्यात आले आहेत.











