अडीच वर्षापासुन ड्रग्जचा सुळसुळाट, दीड हजार तरुण नशेच्या विळख्यात
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथे होत असलेल्या ड्रग्ज तस्करी व सेवनाच्या विरोधात तुळजापूर येथील पुजारी, व्यापारी व नागरिक आक्रमक झाले असुन त्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. ड्रग्ज रॅकेट मोडुन काढा अन्यथा रस्ता रोको, तुळजापुर बंदचा इशारा दिला आहे. 20 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे तुळजापूर येथे येणार असुन त्याना शहरवासियांच्या वतीने ड्रग्ज तस्करी, रॅकेट चालवणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. पालकमंत्री यांना निवेदन देऊनही कारवाई नं झाल्यास आक्रमक भुमिका घेत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आताच रोखा नाही तर ड्रग्ज घरापर्यंत येईल अशी भुमिका घेतली आहे.
तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात ड्रग्जचा बाजार सुरु असुन शहर व परिसरातील जवळपास दीड हजार तरुण ड्रग्जच्या विळख्यात असल्याचा दावा तुळजापूर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला. तुळजापुरात अडीच वर्षांपासून ड्रग्ज तस्करी होत असल्याचा दावा करीत ड्रग्ज तस्करी आणि सेवनाचं मोठं रॅकेट सुरु असल्याचा खळबळजनक आरोप पुजारी व नागरिकांनी बैठकीत केला. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या कानावर विषय घालून ही यावर तोडगा निघाला नाही. ड्रग्ज तस्करी आणि सेवनावर पोलिसांकडून पांघरून घातल्याचाही गंभीर आरोप यावेळी केला.
तुळजापूर येथील ड्रग्ज विरोधात पुजारी आणि व्यापारी एकवटले असुन तुळजापुरात ड्रग्ज विरोधात कारवाईसाठी मोठी बैठक घेण्यात आली. ड्रग्ज विरोधात ठोस कारवाई झाली नाही तर रस्ता रोको, तुळजापूर शहर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला. तुळजापूर पोलिसांची दोन दिवसांपूर्वी ड्रग्ज जप्तीची कारवाई करण्यात आली त्यात पोलीस कारवाईत सापडलेल्या ड्रग्जपेक्षा अधिकचा साठा असल्याचाही दावा केला आहे.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी ड्रग्ज प्रकरणात लक्ष घातल्यानंतर तुळजापुरात विक्रीसाठी येणारे अडीच लाख रुपयांचे 59 पुड्या एमडी ड्रग्स पकडण्यात पोलिसांना यश आले. तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना अटक केली असुन ते अट्टल गुन्हेगार आहेत. न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ड्रग्ज प्रकरणात मुंबई येथील एका महिलेचे नाव समोर आले असुन हे ड्रग्ज तुळजापूर कोणाला विकले जाणार होते याचा तपास पोलीस करीत असुन ड्रग्ज खरेदी करणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. तामलवाडी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.