बीड – समय सारथी
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या 73 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली आहे.संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला वाढवून देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या नावाने आदेश तयार करून शासनाची 73 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणात एसआयटीकडून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची चौकशी करण्यात आली, त्यानंतर लातुर येथुन अटक करण्यात आली. एसआयटीचे प्रमुख अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
73 कोटी प्रकरणात गुन्हा नोंद झाला आहे मात्र, एकूण 241 कोटी 62 लाख रुपयांच्या वाढीव मोबदल्याचे बनावट आदेश काढले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अविनाश पाठक जिल्हाधिकारी पदावरून बदलून गेल्यानंतरही त्यांच्या नावे मागील तारखेत स्वाक्षरी करून बनावट आदेश वापरल्याचा आरोप आहे.
अविनाश पाठक हे 22 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी पदावरून बदलून गेल्यानंतरही, त्यांच्या कार्यकाळातील मागच्या तारखा 1 मार्च ते 17 एप्रिल 2025 वापरून बनावट आदेश काढण्यात आले. या आदेशांद्वारे 154 प्रकरणांमधील वाढीव मोबदला तब्बल 241 कोटी 62 लाख रुपयांनी वाढवण्यात आला. धक्कादायक म्हणजे, यातील 73 कोटी 4 लाख रुपयांचे वाटपही संबंधित खातेदारांना करण्यात आले आहे. या प्रक्रियेत कोणतीही अधिकृत नोंदवही ठेवण्यात आली नव्हती.
या प्रकरणी महसूल कर्मचारी आणि वकिलांसह एकूण दहा जणांवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय हांगे (सहायक महसूल अधिकारी), त्र्यंबक पिंगळे (कंत्राटी कर्मचारी), शेख अजहर शेख बाबू (कंत्राटी कर्मचारी) हे अटक आहेत. ऍड नन्नवरे, ऍड पिसुरे, ऍड प्रवीण राख आणि ऍड नरवाडकर हे आरोपी आहेत. पांडुरंग पाटील, राऊत आणि अविनाश चव्हाण हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.











