धाराशिव – समय सारथी
विवाह होऊन अवघे 30 दिवस होत नाहीत तोच नववधूने साथीदारांच्या मदतीने पतीच्या घरातील 17 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव शहरातील भाग्यानगर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध फसवणूक व खंडणीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले शिवराज संग्राम पाटील (वय २८, रा. सुंडगी, जि. नांदेड, सध्या रा. सा. बा. विभागाचे शासकीय निवासस्थान क्र. ४/८, भाग्यनगर, धाराशिव) यांचा विवाह 13 मे रोजी शुभांगी ऊर्फ साक्षी मच्छिंद्रनाथ वारले (रा. वाधी, भंडार पल्ली मंडळ, बोधन, जि. निजामाबाद, तेलंगणा) यांच्याशी झाला होता. मात्र, विवाह झाल्यानंतर त्या पत्नीप्रमाणे वागत नव्हत्या यामुळे पाटील त्रस्त झाले होते.
त्यांनी लग्न जुळवणाऱ्या व सध्या पळून गेलेल्या पत्नीच्या नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. तेव्हा गुरुवारी महेश पाटील (रा. शुगन सिटा, कोठा, ता. जि. नांदेड), नवीनकुमार पाटील (रा. बनाळी, ता. धर्माबाद), सुंदरबाई पाटील (रा. देगलूर), शंकर खापटे (रा. बनाळी, ता. धर्माबाद), शिवम खबुजे (रा. भंडारपल्ली मंडळ, बोधन, तेलंगणा), गोरखनाथ वारले, जालिंद्रनाथ वारले, शुभम वारले (तिघे रा. जि. निर्मल, तेलंगणा) आधी घरी आले. त्यांनी पत्नीला समजावून सांगण्याचे नाटक केले. नंतर अचानक ते घरातून निघून गेले. जाताना शुभांगी यांना सोबत नेले. आम्ही तिला समजावून परत पाठवून देतो, असे म्हणून पाटील यांचा निरोप घेतला.
नंतर पाटील यांच्या लक्षात आले की, घरातील 17 तोळे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण 27 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केल्याचे समजले. फिर्यादी हे शासकीय पदावर कार्यरत असल्याचा फायदा उठवत त्याची व त्यांच्या पदाची समाजात बदनामी करण्याची आणि प्रतिमा मलिन करण्याची धमकी आरोपींनी दिली, ही बदनामी टाळण्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडे 50 लाख रुपयांच्या खंडणीची थेट मागणी केली तसेच त्यांना मानसिक त्रास देऊन गुन्हेगारी स्वरूपाची धमकी दिली.
विसरलेल्या मोबाईलमुळे फसवणूक उघड
सर्व पाहुणे पत्नीला सोबत घेऊन गेल्यानंतर बेडरूममधील बेडवर उशाखाली एक मोबाईल फोन ठेवलेला आढळला. यावेळी पाटील यांनी मोबाईल उघडून पाहिला असता त्यामध्ये संबंधित वधूसह तिचे अन्य मुलांबरोबर विवाह केल्याचे छायाचित्रे आढळून आले. तसेच काही जणांसोबत विवाहासंबंधी चॅटिंग केल्याचा मजकूरही दिसून आला. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले.











