धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार’ या शीर्षकाखाली एक अभूतपूर्व काव्यसंग्रह साकार झाला आहे. विशेष म्हणजे, देशभरातील 156 दिग्गज आणि नवोदित कवींच्या कवितांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शरद गोरे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे.
महाराष्ट्र,कर्नाटक,मध्यप्रदेश,गुजरात,केरळ,गोवा आदी राज्यातील कवींनी कवितेतून अजितदादांना काव्यांजली वाहिली आहे,या बहुप्रतीक्षित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा 29 मे रोजी ऐतिहासिक धाराशिव नगरीत संपन्न होणार आहे. निमित्त आहे, 32 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे.राज्याच्या उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते या ग्रंथाचे थाटात प्रकाशन करण्यात येणार आहे.
साहित्याच्या व्यासपीठावरून एका लोकनेत्याच्या कर्तृत्वाचा जागर होणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच मोठी घटना मानली जात आहे.अजितदादांच्या राजकीय प्रवासापासून त्यांच्या प्रशासकीय कौशल्यापर्यंतचे सर्व पैलू या 156 कवितांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत. या सोहळ्यासाठी धाराशिवमध्ये साहित्यिकांची मोठी मांदियाळी जमणार असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकाशन सोहळ्याकडे लागले आहे.











