ड्रग्ज तस्करीत 15 महिने फरार – पोलिसांचा शोध सुरु, सराईत आरोपी, 7 गुन्हे दाखल
धाराशिव – समय सारथी
नळदुर्ग येथील गुटखा तस्करी व पोलिसांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा प्रकरणी दाखल गुन्ह्यात इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकूर याला धाराशिव कोर्टाने अटकपुर्व जामीन नाकारला आहे. ठाकूर हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर नळदुर्ग व तुळजापूर येथे 7 गुन्हे नोंद आहेत. प्रतिबंधीत पदार्थांची खरेदी कोठून केली, हे प्रतिबंधीत पदार्थ कोठे तयार केले आणि हे पदार्थ कोण विकत घेणार होते, या सर्व गोष्टींचा तपास होणे बाकी आहे, असे निरीक्षण नोंदवित अतिरिक्त सत्र न्यायाधीश आवटे यांनी अर्ज फेटाळला आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी जामीन अर्जाला विरोध करीत अनेक मुद्यावर प्रभावी युक्तिवाद केला.
फिर्यादी हा घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. सर्व आरोपींची नावे फिर्यादीमध्ये नमूद आहेत, त्यात प्रत्येक आरोपींचा गुन्हयामधील सहभाग नमूद केलेला आहे. सर्व आरोपींनी संगणमताने हा गुन्हा केलेला आहे, असे सकृतदर्शनी दिसून येते. सुमारे 50 गोण्यांमधून आरोपींनी गुटखा व तस्सम पदार्थ वाहतुक करत होते. यावरुन गुन्हयाचे स्वरुप लक्षात येते. आरोपी संजय जगताप हा टेम्पो चालक आहे. आरोपी सचिन पवार आणि सतीश सोंडगे हे सुध्दा या गुन्हयामध्ये सामील असून त्यांनी कारमधून त्या टेम्पोला संरक्षण पुरविले आहे. प्रतिबंधीत पदार्थांची खरेदी कोठून केली, कोठे तयार केले आणि हे पदार्थ कोण विकत घेणार होते या सर्व गोष्टींचा तपास होणे बाकी असल्याचे निरीक्षण नोंदवित जामीन फेटाळला.
आरोपी ठाकूर याचे वकील अमोल वरुडकर यांनी युक्तीवाद केला की, आरोपीने पोलिसाविरुध्द तक्रारी केल्यामुळे त्यास या खोट्या गुन्हयामध्ये गोवले आहे. आरोपीने जर पोलिसांना धमकावले असते तर पोलिसांना त्यास पकडता आले असते. आरोपी घटनास्थळी हजर नव्हता. आरोपी विरुध्द जरी काही गुन्हे नोंद असले तरी त्या गुन्हयातून त्यास जामीनावर मुक्त केले आहे. त्यामुळे अटकपुर्व जामीन अर्ज करावा.
जिल्हा शासकीय अभियोक्ता ऍड महेंद्र देशमुख यांनी असा युक्तीवाद केला की, आरोपी हे 33 लाख किमतीचा गुटखा किंवा तस्सम पदार्थ वाहतुक करत होते. या पदार्थांची वाहतुक करणे बेकायदेशीर आहे. आरोपींनी फिर्यादी यास आपले कायदेशीर कर्तव्य बजावतांना अडथळा केला आहे. या प्रकरणातील आरोपी इंद्रजीत रणजितसिंग ठाकूर हा मुख्य गुन्हेगार आहे. तो अदयाप फरार आहे. आरोपींनी हे पदार्थ कोणाकडून आणले आणि कोणाला विक्री करणार आहे, हा तपास होणेबाकी आहे. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे अर्ज नामंजूर करावा.
नळदुर्ग गुटखा तस्करी गुन्ह्यात अटक 3 आरोपींचा जामीन अर्ज धाराशिव कोर्टाने फेटाळला असुन ते धाराशिव येथील कारागृहात आहेत. नळदुर्ग येथील घटनेचा व्हायरल व्हिडिओ समोर आला असुन त्यात ठाकुर पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहे. गुटखा रॅकेट प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भुमिका घेतली असुन कारवाईसाठी पोलिस महासंचालक यांना पत्र तर पोलिस अधीक्षकांवर हक्कभंगाचा इशारा दिला आहे तरी ठाकुर सापडेना.
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकूर याने अटकपुर्व जामीन मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला मात्र कोर्टाची कडक भुमिका लक्षात येताच माघार घेतली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली. तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 39 आरोपी निष्पन्न झाले असुन ठाकुर व वैभव गोळे हे 2 आरोपी अद्याप फरार आहेत. ठाकुर हा गेली 15 महिन्यापासुन फरार असुन तो सापडत नसल्याने पोलिस हतबल झाले आहेत.












