धाराशिव – समय सारथी
अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर धाराशिव जिल्ह्यात खव्यानंतर आता दूध डेअरी व बिर्याणी दुकानावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. प्रसिद्ध असलेल्या कळंब येथील मराठवाडा डेअरी व मराठवऱ्हाड यावर अन्न व प्रशासनाने कारवाई केली करीत दुग्धजन्य पदार्थाचे नमुने घेतले आहेत तर धाराशिव शहरातील मातोश्री बिर्याणी येथील सुद्धा नमुने घेतले आहेत. या नमुन्याचा अहवाल आल्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरणार आहे.
दुध डेअरी, उत्पादने व बिर्याणी दुकानावर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. ग्राहकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मातोश्री या बिर्याणी दुकानात मागील आठवड्यात बिर्याणीमध्ये झुरळ सापडला होता, निष्काळजीपणामुळे तसे झाले असेल याची कबुली देण्यात आली होती त्यानंतर इथल्या स्वच्छता व इतर मुद्दे समोर आले.
मराठवाडा डेअरी येथुन दही व आईस्क्रीमचे तर मराठव्हराड दूध केंद्रावरून दुधाचे नमुने घेण्यात आले असुन ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. खवा, दुध, तुप यासह अन्य वस्तुत मोठ्या प्रमाणात भेसळ होत असुन थंड व फिल्टर जारचे पाणी नावाखाली साधे पाणी विकणारे मोठे रॅकेट आहे. मुंडे यांनी पदभार घेतल्यापासुन मेडिकल दुकाने, गुटखा व इतर लोकांनी धास्ती घेतली आहे तर सामान्य नागरिक खुश आहेत.









