धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेतील बोगस बिले प्रकरणी आरोपांच्या चौकशीला सुरुवात झाली असुन मुख्याधिकारी वसुधा फड यांना लेखी पत्र लिहीत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश चौकशी समितीचे सचिव तथा जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांनी दिले आहेत. मुद्याच्या अनुषंगाने कार्यकाल कालावधी दर्शविणारी माहिती, फड यांच्या कायाकाळातील अदा करण्यात आलेल्या देयकांची योजनानिहाय यादी, छाननी तक्ता, सर्व योजनांच्या रोखपुस्तिका (कॅश बुक) बँक अकाउंट स्टेटमेंटच्या साक्षांकित प्रती (योजनानिहाय), वर्षनिहाय प्राप्त निधी, झालेला खर्च, मोजमाप पुस्तिका, प्रशासकीय मान्यता आदेश तांत्रिक मान्यता आदेश, निधी वितरण आदेश, कामाच्या संचिका व इतर अनुषंगिक अभिलेखे 30 जानेवारी 2025 पर्यंत चौकशी समितीकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
बोगस बिले प्रकरणी चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांनी 4 सदस्यांची समिती गठीत केली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव हे या समितीचे अध्यक्ष असणार असुन मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे हे सचिव तर कार्यकारी अभियंता बांधकाम शिवराम केत, उपविभागीय अभियंता नागनाथ काळे हे सदस्य असणार आहेत. समितीने त्यांच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे. धाराशिव नगरपरिषदेच्या विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड यांनी धाराशिव नगरपरिषद अंतर्गत लेखासंहिता 2013 प्रकरण कामे अंतर्गत नियम 138 प्रमाणे कार्यवाही करीता कामांचा छाननी तक्ता तयार करून विविध विभागातील बोगस बिले काढले असल्याची तक्रार आमदार सुरेश धस यांनी केली होती शिवाय याबाबत तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता.
तक्त्यानुसार मुख्याधिकारी धाराशिव यांनी सदरील कामे मुदतीत पुर्ण केलेली आहेत काय याची खातरजमा केलेली आहे काय तसेच सदरील कामात मुदतवाढ देण्यात आलेली आहे काय ? दिली असल्यास त्यासाठी कंत्राटदाराचा अर्ज इंजिनीअरचा अभिप्राय व प्रशासकीय ठराव याबाबतची पूर्तता केलेली आहे काय ? त्याच्या आवक जावक नोंदीसह सर्व कागदपत्रांची मुख्याधिकारी धाराशिव यांनी खातरजमा केलेली आहे काय? सदरील कामाचा पुर्णत्वाचा दाखला आहे काय? सदरील मागील देयके देत असताना विद्यमान मुख्याधिकारी यांनी प्रशासकीय ठराव घेतलेला आहे काय ? याचीही माहिती विनाविलंब मागवली आहे.