धाराशिव – समय सारथी
यावर्षी अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने अनेक भागांत गंभीर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस तसेच अन्य पिकांवर पावसाच्या कमतरतेचा मोठा परिणाम झाला असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात तातडीने विशेष सर्वेक्षण व पंचनामे करून तात्काळ दुष्काळ जाहीर करून विशेष पॅकेज जाहीर करावे अशी अशी मागणी आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये पिकांची वाढ समाधानकारक झालेली नाही. पिकांसाठी आवश्यक ओलावा उपलब्ध नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, काही तालुक्यांत संपूर्ण पीक नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर उत्पादन खर्च वसूल करण्याचेही मोठे संकट उभे राहिले आहे.
पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा-पाणी, भूजल पातळी, ग्रामीण भागातील रोजगार आदी प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थितीचा तातडीने वस्तुनिष्ठ आढावा घेणे आवश्यक असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.दुष्काळ जाहीर करण्यासह दहा उपाययोजनांची मागणी त्यांनी केली आहे.
दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई व दुष्काळी अनुदान तातडीने देण्यात यावे, खरीप पिकांचे पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे मदत द्यावी, पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती देऊन कर्जाचे पुनर्गठन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी विशेष कार्यवाही करावी, पिण्याच्या पाण्याची समस्या असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करून चारा व पाण्याची व्यवस्था करावी, तसेच ग्रामीण भागात मनरेगा व इतर रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत अथवा स्थगिती देण्याबरोबरच आगामी हंगामासाठी बियाणे, खते व अन्य आवश्यक कृषी निविष्ठा शासनामार्फत उपलब्ध करून द्याव्यात. तसेच धाराशिव जिल्ह्यासाठी परिस्थितीच्या गांभीर्यानुसार विशेष दुष्काळी आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.











