धाराशिव – समय सारथी
पावसातील अनिश्चितता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा सुरळीत मिळाव्यात,तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज राहावी,या दृष्टीने जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून, त्यानुषंगाने विविध विभागांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवरही चर्चा होणार आहे.नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागात पाण्याची अडचण भासू नये,उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर व्हावा आणि संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करता यावे,या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव,उमरगा,कळंब व भूम येथील उपविभागीय अधिकारी, तसेच धाराशिव,तुळजापूर, उमरगा,लोहारा,कळंब,वाशी, भूम,परंडा येथील सर्व तहसीलदार आणि अपर तहसीलदार नळदुर्ग यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय अधीक्षक अभियंता, धाराशिव पाटबंधारे मंडळ,कृषी विकास अधिकारी,जिल्हा परिषद; कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,सर्व गटविकास अधिकारी,सर्व तालुका कृषी अधिकारी,वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा; IITमार्फत काम पाहणारे वरिष्ठ प्रोजेक्ट मॅनेजर तसेच धाराशिव पाटबंधारे मंडळातील सर्व उपअभियंते यांनाही बैठकीस उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना महसूल,कृषी,पाटबंधारे, भूजल,पाणीपुरवठा आणि ग्रामीण विकासाशी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रातील परिस्थिती,उपलब्ध पाणीसाठा, भूजलाची स्थिती,कृषी क्षेत्रावरील परिणाम आणि आवश्यक उपाययोजना यांचा एकत्रित आढावा या बैठकीच्या निमित्ताने घेतला जाणार आहे.
या बैठकीला संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाची अद्ययावत माहिती घेऊन बैठकीस उपस्थित राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी कळविले आहे.











