धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा भाजपात अंतर्गत धुसफुस सुरूच असुन अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषद आमदार बसवराज पाटील यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना ताई पाटील यांना स्थान देण्यात आले नसुन शिवसेना उबाठा गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनातर मानाचे स्थान दिले आहे.
पाटील विरुद्ध पाटील हा सत्ता केंद्राचा संघर्ष व रस्सीखेच तशी जुनीच आहे, काँग्रेस व राष्ट्रवादीत असतानाही हा सुप्त संघर्ष सुरु होता. दोन्ही पाटील भाजपात आले तरी देखील सत्ता केंद्राचा वाद सुरूच आहे. निमंत्रण पत्रिकेत नाव व फोटो टाळत एकीकडे पाटील परिवाराला डावलले तर दुसरीकडे स्वामींना मानाचे पान दिले. विशेष म्हणजे या शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व शरण पाटील फाउंडेशन उमरगा लोहारा यांच्यावतीने करण्यात आले आहे, असे असतानाही पाटीलांना डावलले.

आमदार राणाजगजीतसिंह हे भाजपचे जिल्ह्यातील एकमेव विधानसभा आमदार असुन मित्राचे उपाध्यक्ष आहेत तर त्यांच्या पत्नी अर्चना ताई ह्या जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत, दोघानाही शासकीय राजशिष्टाचार आहे. पत्रिकेवर सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांचा फोटो आहे. मागील महिन्यात जुना व नवीन भाजप असा वाद पेटला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा या निमित्ताने ठिणगी पडली आहे. आमदार स्वामी यांची पाटील कुटुंब व भाजपची जवळीक गेल्या काही दिवसात वाढल्याचे अधोरेखित झाले.
उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघस्तरीय मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबिराचे आयोजन 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुरूम येथील श्री. विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना स्थळी करण्यात आले आहे. आमदार बसवराज पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असुन आरोग्य व महिला विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते याचे उदघाटन होणार आहे. राज्यसभा खासदार डॉ अजित गोपछडे हे प्रमुख अतिथी असतील.
शिवसेना उबाठा गटाचे आमदार प्रवीण स्वामी, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षचे प्रमुख रामेश्वर नाईक, मुरूमचे नगराध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, डॉ स्वानंद सोनार उपसंचालक (स.चि.) तथा प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते, उमरगा लोहारा मतदारसंघांचे सह अध्यक्ष शरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.











