धाराशिव – समय सारथी
सोलापूर येथील तडीपारीसारखी कारवाई झालेला सराईत गुंड मटका किंग अरुण प्रभाकर रोडगे उर्फ दादा रोडगे यांच्या तुळजाभवानी गाभारा प्रवेश व फोटोसेशन प्रकरणी तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद विलासराव गंगणे यांना जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थांनाचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गंगणे यांचे तुळजाभवानी मंदीर संस्थांनाचे विश्वस्त म्हणुन असलेले सदस्यत्व का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीस दिली असुन 48 तासात खुलासा देण्याचे आदेशीत केले आहे.
गाभारा प्रवेश प्रकरणी जिल्हाधिकारी व मंदीर संस्थान आता ऍक्शन मोडवर आले असुन ठोस कारवाई करीत हे. सहायक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले यांना निलंबित केले आहे. गंगणे यांना नोटीस दिल्यानंतर खळबळ उडाली असुन तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या इतिहासात प्रथमच विश्वस्तना त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची नोटीस दिल्याचे बोलले जात आहे.
जी नोटीस दिली आहे ती चुकीची आहे, जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थान यांना अशी नोटीस देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. मंदीर नियमावलीत तशी तरतूद आहे का असे म्हणत कायदेशीर मुद्दे उपस्थितीत करीत बोटं ठेवले आहे. मी गाभाऱ्यात कोणालाही आत सोडले नाही किंवा गाभाऱ्यात घेऊन गेलो नाही, कोणालाही दमदाटी केली नाही. आत जाताना कोणी का अडविले नाही. आकसापोटी कारवाई केली जात असुन नोटीसीला योग्य उत्तर देऊ. विश्वस्त म्हणुन सर्वांना काय काय अधिकार आहेत हे अधि ठरवावे. रोडगे याची पूजा कोण केली ? त्याची दक्षिणा कोण घेतली हेही समोर आले पाहिजे असे गंगणे म्हणाले.
एकंदरीत गंगणे नोटीस प्रकरणात आगामी काळात कायदेशीर मुद्याचा कीस पडणार आहे. एरव्ही मंदीर संस्थान 1909 मध्ये बनविलेल्या निजामकालीन ‘देऊळ ए कवायत’ या नियमांचा आधार घेऊन कारवाई करते त्यात पुजारी यांचे गैरवर्तन, दंड, मंदीर प्रवेश बंदी याचा समावेश असतो. गंगणे यांना दिलेल्या नोटीसमध्ये कोणत्या आधारे व नियमानुसार सदस्यत्व रद्द केले जाईल याचा उल्लेख इतर नोटीस प्रमाणे नसल्याच्या मुद्यावर गंगणे यांनी बोटं ठेवले आहे. कवायतमध्ये 56 नियम असुन कोणता आधार घेतात हे पाहावे लागेल.
रोडगे याचे गाभाऱ्यातील जे फोटो व्हायरल झाले त्यात विश्वस्त तथा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे स्वीय सहायक सुधीर जमदाडे व इतर स्पष्ट दिसतात, त्यांच्यावर मात्र अद्याप कोणतीही कारवाई केली नाही हे विशेष. भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम यांनी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिसांनी अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.











