धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील कला केंद्राचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन नुकतेच जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी विविध त्रुटीमुळे अंबिका, न्यु रेणुका व प्यासा या 3 नवीन कला केंद्राचे नाकारले आहेत. कला केंद्र, गुन्हेगारी, नर्तिकांचे लैंगिक शोषण, ग्राहकांची आर्थिक लुबाडणुक हे वास्तव असुन त्यामागे मोठे अर्थ व राजकारण आहे. धाराशिव जिल्ह्यात कला केंद्र पुन्हा सुरु करण्यासाठी जोरदार लॉबिंग व हालचाली सुरु झाल्या आहेत, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचे कळते.
कला केंद्र मुक्त धाराशिव जिल्ह्यासाठी काही नेते व प्रशासन आग्रही आहे तर काही जण छुपी रसद पुरवीण्यात धन्यता मानत आहेत. प्रशासन नियमांचा आधार घेत असुन त्रुटीची यादी हाती देत आहे. गुन्हेगारी, आर्थिक लुट, मोडलेले संसार, व्यसनाधिनता त्यातच दुष्काळाचे भीषण सावट असल्याने कला केंद्रबाबत स्थानिक नागरिकांत मोठा जनक्षोभ असुन रस्त्यावर उतरून आंदोलनाची तयारी केली आहे. वडगाव ज, आळणी, चोराखळी ही गावे व आसपासचा परिसर तर कला केंद्रासाठी बीड, सोलापूर, अहिल्यानगर, लातुर यासह राज्यभर ओळखला जाऊ लागला आहे.
जिल्हाधिकारी यांनी सुनावणी अंती तुळजाई, पिंजरा, कालिका, महाकाली, गौरी, साई ही 6 कला केंद्राचे परवाने रद्द करून सील ठोकले आहे. त्यापैकी काही जणांनी उच्च न्यायालयात दरवाजे ठोठावले आहेत तर काहींनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशा विरुद्ध विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील केले आहे, तिथेच पाणी मुरत असुन मोठ्या घडामोडी घडू शकतात. देवी देवतांची नावे देऊन जिल्ह्यात जुने व नवीन अशी तब्बल 10 ते 12 कला केंद्र प्रस्ताव आहेत.
काही कला केंद्रात नर्तिका असलेल्या महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची, त्यांना वेश्या व्यवसाय करायला भाग पाडल्याची ‘आपबिती’ मांडत त्यांनी गुन्हे सुद्धा दाखल केले आहेत तर काही ठिकाणी खुन, गोळीबार, हाणामारीसारख्या घटना घडल्याने गुन्हे नोंद आहेत. कला केंद्र बंद झाल्याने या भागातील गुन्ह्यांचे प्रमाण सुद्धा कमी झाले असुन सामाजिक व कौटुंबिक फायदा झाला आहे, अश्यात काही हालचालीना वेग आला आहे.
आळणी येथे प्यासा लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र सुरु करण्यासाठी श्रीपाल नारायण वीर व कळंब तालुक्यातील भाटशीरपुरा येथील शितल अच्युतराव गायकवाड यांनी प्रस्ताव सादर केला होता मात्र तो विविध कारणाने नाकारला आहे. गायकवाड हे धाराशिव येथे ज्ञानाचे धडे देणाऱ्या एका नामांकित शिक्षण संस्थेत सेवेत असल्याची माहिती आहे, त्यांनी आता कला केंद्र हा ‘जोड धंदा’ स्वीकारत जवळपास 25 स्वतंत्र रूम असलेली दीड ते 2 कोटींची इमारत उभी केली आहे. समाजाने यातुन काय ‘आदर्श’ घ्यावा हा प्रश्न आहे. कला केंद्रात मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने काही जणांची छुपी पार्टनरशीप असल्याची चर्चा आहे. याच पाठबळ व गुंतवणूकीतून ‘टोलेजंग’ कला केंद्र बांधली आहेत.
खुला रंगमंच, बंद खोलीत कला सादरीकरण, घुंगरू ऐवजी डीजेवर गाणे, कलाकारासाठी खोल्या, छापील तिकीट, जीएसटीसह अन्य परवाने, नियमानुसार बांधकाम, ग्रामसभेचे ठराव व उपस्थितीत ग्रामस्थ सह्या, गुन्हेगारी पार्शवभुमी, राष्ट्रीय महामार्ग नियमासह अन्य नियमाची जंत्री मोठी आहे. कला केंद्रबाबत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक रितू खोखर यांची जनहिताची ठोस भुमिका आहे. यापुढेही नियम व त्यांची भुमिका अहवाल महत्वाचे ठरणार आहेत.
बाबासाहेब घाटे यांचा ‘पिंजरा’ तर अक्षय साळुंके यांच्या ‘महाकाली’ कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला होता त्यांनी नव्याने ‘नटरंग’ हा नवीन कला केंद्रसाठी अर्ज केला आहे. नवीन 6 प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याने एकही नवीन परवाना जिल्हाधिकारी यांनी दिलेला नाही. काही जणांनी दसरा व दिवाळीचा मुहूर्त गाठत कला केंद्र पुन्हा जोमाने सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. नियमांची पूर्तता करून प्रशासनाने लावलेले ‘सील’ निघणार का ? हे पाहावे लागेल.











